लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मी मोठा की तू, असा वाद निर्माण झाल्याने किरकोळ बाचाबाचीनंतर दोन गुंडांनी त्यांच्या एका साथीदाराला घातक शस्त्राने भोसकून त्याची हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वांजरा वस्तीत शनिवारी सायंकाळी ५ ते ५.३० च्या सुमारास हा थरार घडला. चेतन कमलसिंग ठाकूर (वय २०, रा. पार्वतीनगर कळमना) असे मृताचे नाव असून त्याची हत्या करणाऱ्या आरोपींची नावे दीपेश गजबलाल पाचे (वय २०, रा. चित्रशाळानगर) आणि साहिल शाह (वय २०, रा. वांजरा) अशी आहेत.
चेतन आणि दीपेश हे दोघेही मित्र होते. ते गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोघांनी काही दिवसांंपूर्वी कळमन्यातील एका गुराख्यावर हल्ला करून त्याची बकरी चोरून नेली होती. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी दीपेश, चेतन यांना अटक करून कारागृहात डांबले होते. दीपेशला लवकर जामीन मिळाल्याने तो चेतनच्या अगोदर कारागृहातून बाहेर आला. नंतर मात्र तो चेतनला कारागृहात भेटायला गेला नाही किंवा त्याच्या जामिनासाठीही त्याने प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे कारागृहातून बाहेर पडल्यानंतर चेतन दीपेशला शिवीगाळ करत होता.
दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात वादही झाला होता. या पार्श्वभूमीवर, शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास चेतन, दीपेश, साहिल आणि अन्य काही जण दारूच्या नशेत प्रतिभा लॉनजवळच्या एका पानटपरीजवळ बसले होते. तेथे त्यांच्यात पुन्हा याच मुद्द्यावरून वाद झाला. चेतन नेहमी नेहमी स्वत:चे वर्चस्व दाखवण्यासाठी धाकदपट करत असल्याची भावना झाल्याने दीपेश चिडला. ‘तू बहोत बडा रंगदार हो गया क्या’, असे म्हणत त्याने तसेच साहिलने चेतनवर धारदार शस्त्राने घाव घातले. तो खाली पडल्यानंतर आरोपीने बल्लीनेही त्याला ठेचले. या घटनेची माहिती कळताच कळमन्याचे बीट मार्शल तिकडे पोहचले. त्यांनी कळमना ठाण्यात माहिती देऊन जखमी चेतन ठाकूरला मेयोत नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आरोपी घटनास्थळीच जेरबंद
माहिती कळताच कळमना पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. त्यांनी आरोपी दीपेश आणि साहिलला घटनास्थळीच ताब्यात घेतले. ते दारूच्या नशेत टुन्न होते, अशी माहिती आहे. दीपेश प्रारंभी कॅटरिंगचे काम करायचा. अल्पावधीत मोठी रक्कम मिळवून ऐशोआरामाचे जीवन जगण्याची इच्छा बळावल्याने तो चेतनसोबत चोऱ्या, मारामाऱ्या करत होता. नंतर भाईगिरीचे भूत डोक्यावर चढल्यामुळेच दीपेशने साहिलच्या मदतीने मित्र असलेल्या चेतन ठाकूरची हत्या केल्याचे प्राथमिक चाैकशीत उघड झाले आहे.