लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमली पदार्थाचे व्यसन जडलेल्या दोन गुन्हेगारांचा नशेत वाद झाला. त्यामुळे एकाने दुसऱ्या गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या केली. शुभम उर्फ कचरा राजेश मासुरकर (वय २७) असे मृताचे नाव असून तो मायानगर झोपडपट्टीत राहत होता. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे जरीपटक्यात मोठी दहशत निर्माण झाली होती. कचरा हा जरीपटक्यातील जुना गुन्हेगार होता. तर आरोपी रोहित मून हादेखील गुन्हेगारच आहे. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दोघेही नशेडी असल्याने बरेचदा ते चोरी-लुटमारीसारखे गुन्हे एकत्रच करायचे आणि त्यातून व्यसन भागवायचे. कधी एकमेकांना नशेसाठी उधार पैसे द्यायचे. अशाच साडेचार हजार रुपयांच्या व्यवहारातून गुरुवारी सायंकाळी जरीपटक्यातील आर्यनगरात त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपी मून याने कचऱ्या मासुरकरला दगडाने ठेचून ठार मारले.
---
तीन दिवसांत दुसरी हत्या
या घटनेची माहिती कळताच जरीपटक्याच्या पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे आपल्या ताफ्यासह तेथे पोहोचल्या. परिसरातून माहिती काढून त्यांनी मूनला ताब्यात घेतले. तो नशेत टून्न असल्यामुळे भलतीसलतीच माहिती देत होता. पोलिसांनी मूनचा साथीदार गजऱ्या सहारेलाही चाैकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, तो घटनेच्या वेळी दुसरीकडे होता, असे प्राथमिक चाैकशीत स्पष्ट झाल्याची माहिती ठाणेदार तृप्ती सोनवणे यांनी दिली. दरम्यान, तीन दिवसांतील शहरातील हत्येची ही दुसरी घटना आहे. पाचपावलीत सोमवारी भर दुपारी पिंकी वर्मा या तरुणीची गुंडांनी हत्या केली होती.
-------