काँग्रेसचा हल्लाबोल : जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासननागपूर : मतदार यादींमध्ये बोगस मतदारांची नावे आल्याने अशा बोगस मतदारांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी काँग्रेसने शहरअध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल केला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करीत कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतांना बोगस मतदार आणि मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर येत्या आठ दिवसात गुन्हे दाखल केले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले. हिलटॉप प्रभागात मागील अनेक वर्षांपासून सातत्याने बोगस मतदारांची नोंदणी केली जात आहे. यासंदर्भातील पुराव्यानिशी निवेदन काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात १७ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. तेव्हा महिनाभरात कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. दीड महिना लोटूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे शनिवारी दुपारी ३ वाजता काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. मुख्य गेट बंद करण्यात आले होते. कार्यकर्ते नारेबाजी करीत गेटवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे थोडा वेळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलनानंतर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, तानाजी वनवे, सेवादल प्रमुख रामगोविंद खोब्रागडे, प्रशांत धवड, राजू व्यास, डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, अॅड. संदेश सिंगलकर, विजय बाभरे, अॅड. अक्षय समर्थ, देवा उसरे, संजय सरायकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. शिष्टमंडळाशी चर्चा करतांना जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला. आंदोलनात रत्नाकर जयपूरकर, जयंत लुटे, हरीश खंडाईत, किशोर गीद, रजेश कडू, वीणा बेलगे, संजय चौधरी, उमेश शाहू, अशोक यावले, दीपक वानखेडे, प्रशांत कापसे, प्रशांत डाकने, वैभव काळे, नगरसेविका सरस्वती सलामे, रेखा बाराहाते, पुष्पा निमजे, भावना लोणारे, हाजी मो. कलाम, राजश्री पन्नासे, सुजाता कोंबाडे, पद्मा उईके, प्रेरणा कापसे, निमिशा शिर्के, पंकज निघोट, पंकज थोरात, घनशाम मांगे, निर्मला बोरकर, दिनेश तराळे, सुनील चोपडा, इरशाद मलिक, सुकेश निमजे, सुनील दहीकर, किशोर जिचकार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते. (प्रतिनिधी)
बोगस मतदारांवर आठ दिवसात गुन्हे
By admin | Published: November 06, 2016 2:09 AM