लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआयडीसीमध्ये बाईकस्वार गुन्हेगारांनी भरदिवसा एका सराफा व्यावसायिकाची दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग चोरली. महिन्द्र कंपनीजवळ घडलेल्या या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीचा शोध घेत आहेत.
बालानगर निवासी ४७ वर्षी अमित बांगरे यांचे अमरनगर येथे वैष्णवी ज्वेलर्स नावाने दुकान आहे. बांगरे दुकानात ठेवलेले दागिने चोरी होण्याच्या भीतीने दररोज रात्री घरी नेतात.
दररोजच्या सवयीनुसार अमित सकाळी १०.३० वाजता अॅक्टिव्हाने दुकानात जात होते. त्यांच्या बॅगमध्ये ३० तोळे सोने आणि ६५ हजार रोख होती. महिंद्रा कंपनीजवळ हार-फुलाचे दुकान आहे. अमित तेथून हार खरेदी करतात. ते या दुकानाजवळ थांबले. अॅक्टिव्हा पार्क करून हार खरेदी करू लागले. त्यांनी बॅग अॅक्टिव्हाच्या पायदानावर ठेवली होती. त्याचवेळी एका बाईकवर आलेले दोन युवक बॅग घेऊन फरार झाले. अमित यांना काही लक्षात येण्यापूर्वीच आरोपी फरार झाले. त्यांनी या घटनेची सूचना तात्काळ पोलिसांना दिली.
झोन-१ चे उपायुक्त नुरुल हसन, गजानन राजमाने, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक हांडे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्याद्वारे घटनेची विस्तृत माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची शोधमोहीम सुरू केली. आरोपींना अमितच्या रोजनिशीची माहिती असल्याचा संशय आहे. ते घरापासूनच त्यांचा पाठलाग करीत होते.