लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका फौजदारी प्रकरणावरील निर्णयामध्ये ‘डीएनए’चे महत्त्व समजावून सांगितले. डीएनए आधुनिक तंत्रज्ञान असून ते तपास यंत्रणा व न्यायालय यांना खऱ्या गुन्हेगारापर्यंत घेऊन जाते. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा अत्यंत काळजीपूर्वक उपयोग करणे आवश्यक आहे. त्यात थोडीही चूक झाल्यास गुन्हेगार संशयाचा लाभ मिळून मोकळा सुटू शकतो असे न्यायालय म्हणाले.या प्रकरणात तपास अधिकाऱ्याने डीएनए तंत्रज्ञानाचा उपयोग करताना योग्य काळजी घेतली नाही. ‘डीएनए’साठी रक्ताचे नमुने काढणाऱ्या डॉक्टरला न्यायालयात तपासण्यात आले नाही व या प्रक्रियेचा पंचनामा करण्यात आला नाही. तसेच, केमिकल अॅनालायजर्सलाही तपासण्यात आले नाही. परिणामी, संशय निर्माण झाला व त्याचा लाभ आरोपीला मिळाला. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने ‘डीएनए’चे महत्त्व समजावून सांगितले.१९ जुलै २०१८ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने नागेश सामय्या माडे (२४) या आरोपीला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी दोषी ठरवून १० वर्षे कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सुनावताना विविध पुराव्यांसह ‘डीएनए’ अहवालाचा आधार घेण्यात आला होता. आरोपीने या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी विविध बाबींमुळे ‘डीएनए’ अहवाल संशयास्पद ठरवून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला व आरोपीला निर्दोष सोडण्याचा आदेश दिला. आरोपी वियामपल्ली, ता. सिरोंचा येथील रहिवासी असून ही घटना २९ एप्रिल २०१६ रोजी घडली होती. उच्च न्यायालयात आरोपीतर्फे अॅड. राजेंद्र डागा यांनी कामकाज पाहिले.
‘डीएनए’मुळे शोधता येतो गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 11:36 AM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका फौजदारी प्रकरणावरील निर्णयामध्ये ‘डीएनए’चे महत्त्व समजावून सांगितले.
ठळक मुद्देहायकोर्टाने सांगितले महत्त्व तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करणे आवश्यक