अवैध धंद्याचा अड्डा : मनपा प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष नागपूर : महापालिकेच्या अनेक शाळा बंद पडलेल्या आहेत. या जागेचा प्रशासकीय वा व्यावसायिक कारणासाठी वापर व्हावा, या दृष्टीने प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाचे प्रयत्न होत नसल्याने या शाळांवर गुन्हेगारांनी कब्जा करून अवैध धंद्याचा अड्डा बनविला आहे. गड्डीगोदाम येथील भीमशंकर लांजेवार शाळा असामाजिक तत्त्वांच्या ताब्यात आहे. या शाळेच्या मैदानात अवैध बांधकाम सुरू आहे. येथे जुगारापासून सर्वच प्रकारचे अवैध धंदे चालतात. या शाळेत जनावरे बांधली जातात. वेळप्रसंगी कार्यक्रमासाठी शाळा भाड्याने दिली जाते. अशा प्रकारचे उद्योग या शाळेत सुरू असूनही याकडे झोनचे सहायक आयुक्त तसेच महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष आहे. या संदर्भात तक्रारी असूनही प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. याची शहानिशा करण्यासाठी शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांनी बुधवारी या शाळेला भेट दिली असता हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. भेटीप्रसंगी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी येथील फोटो घेण्यास मज्जाव केला. एवढेच नव्हेतर शाळेची पाहणी करण्यालाही त्यांचा विरोध होता. ‘स्कूल चले हम’ ला प्रतिसाद नाही महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा. शाळेला शिस्त लागावी. यासोबतच विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने शिक्षण समितीने स्कूल चले हम योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यात २३ जुलै ते २३ आॅगस्ट २०१६ दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी द्यावयाच्या आहेत. परंतु बोहरे यांनी भेटी दिलेल्या १६ शाळांपैकी एकाही शाळेला अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
मनपा शाळेवर गुन्हेगारांचा कब्जा
By admin | Published: August 03, 2016 2:28 AM