नागपूर : शेतावर राबणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नागपूर जिल्ह्यात अन्य प्राण्यांपेक्षा रानडुकरांचे संकट अधिक असल्याची स्थिती आहे. परिश्रमपूर्वक पिकविलेले पीक हातात येत असताना ते वन्य प्राण्यांकडून फस्त होऊ नये यासाठी रानशिवारावर राबणाऱ्या शेतकऱ्यांना रानडुकरांची अधिक धास्ती आहे.
नागपूर जिल्हातील रामटेक, पारशिवनी, दक्षिण उमरेड, हिंगणा, सेमिनरी हिल्स, नरखेड या पाच वनक्षेत्रांमध्ये मागील पाच वर्षामध्ये वाघ किंवा बिबट या प्राण्यांकडून मनुष्यहानी झाल्याची नोंद वन विभागाकडे नसली तरी रानडुक्कर, नीलगाय आणि लांडगा या प्राण्यांकडून मनुष्यहानी झाल्याची नोंद आहे. महत्त्वाचे म्हणजे या काळामध्ये घडलेल्या घटनांमध्ये रानडुकरांकडून हल्ला होण्याच्या घटनांची संख्या अधिक आहे.
मागील २०१५ ते नोव्हेंबर-२०२० या पाच वर्षांच्या काळामध्ये घडलेल्या घटनांमध्ये वन विभागाने नुकसानभरपाईपोटी ८९ लाख रुपयाची मदत वन विभागाने केली आहे. या मदतीमध्ये ७१ लाख रुपयांच्या मदतीचा समावेश फक्त रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यापोटी मिळालेली आहे. लांडगा आणि नीलगाय या प्राण्यांनी हल्ला केल्याच्या प्रत्येकी एक घटना असून अन्य एका घटनेत मात्र प्राण्याची माहिती वन विभागाकडे उपलब्ध नाही. मात्र वन्यजीवांकडून हल्ला असल्याचे गृहित धरून यातही आठ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
...अशी मिळाली मदत
वर्ष वनपरिक्षेत्र प्राणी नुकसानभरपाई
२०१५ रामटेक अप्राप्त ५ लाख रु.
२०१६ पारशिवनी रानडुक्कर ८ लाख रु.
२०१७ द.उमरेड नीलगाय ८ लाख रु.
२०१७ हिंगणा रानडुक्कर ८ लाख रु.
२०१८ सेमिनरी हिल्स रानडुक्कर १५ लाख रु.
२०१९ सेमिनरी हिल्स रानडुक्कर १५ लाख रु.
२०२० रामटेक रानडुक्कर १५ लाख रु.
२०२० नरखेड लांडगा १५ लाख रु.
एकूण ------------------------------------ ८९ लाख रु.