नागपूर : शासनाने नव्याने लॉकडाऊन जाहीर करून जिल्ह्यातील सलून दुकानदार-कारागीरवर्ग हादरला आहे. मागील वर्षभरात एप्रिल ते मार्च या काळात फक्त पाच महिने व्यवसाय करण्याची संधी मिळाली. आता पुन्हा लॉकडाऊन लागल्याने व्यवसाय बंद पडला आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील सुमारे ४० हजार सलून कारागीर आणि दुकानदार वर्गापुढे नव्याने संकट उभे झाले आहे.
नागपूर शहरात लहान-मोठे मिळून सुमारे १० हजारांवर सलून दुकाने आहेत. तर जिल्ह्यातील सर्व तालुके मिळून सुमारे सात ते नऊ हजारांवर दुकाने आहेत. या १७ ते २० हजार दुकानांमध्ये काम करणारे सुमारे ४० हजार कारागीर व दुकानदारांच्या हातचे कामच हिरावले आहे. मागील काळात झालेल्या लॉकडाऊनमध्ये तब्बल सात महिने दुकाने बंद होती. यामुळे अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. आता पुन्हा लॉकडाऊन लागू झाल्याने हातावर पोट असणाऱ्या सलून व्यावसायिकांचा आक्रोश वाढला आहे.
...
जिल्ह्यात एकूूण केश कर्तनालये - सुमारे १७,००० ते २०,०००
त्यावर अवलंबून असणारे कामगार - ४०,०००
...
कोट
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आमचे सहकार्य आहे. मात्र दुकाने बंद करून रोजगार हिरावण्यापूर्वी आधी सरकारने आमच्या जगण्याची सोय करावी. आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस व्यवसायाला परवानगी द्यावी. किंवा महिनाभराच्या खर्चापोटी कारागीर, दुकानदारांच्या खात्यात १५ हजार रुपये जमा करावेे, नंतरच लॉकडाऊन लावावे. निर्णय न झाल्यास सक्तीने आम्ही दुकाने उघडू.
- धनराज वालुकार, अध्यक्ष, नाभिक एकता मंच
...
कोट
हा आदेश अन्यायकारक आहे. यापृूर्वी आलेल्या प्रचंड आर्थिक ताणाचा आणि निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीचा शासनाने विचार करायला हवा. शासनाच्या या आदेशाच्या प्रति जाळून आम्ही निषेध करू.
गणपतराव चौधरी, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ
...
प्रतिक्रिया
आमच्यावर आधीच कर्ज वाढले आहे. जेमतेम व्यवसाय वेग धरत असताना हा निर्णय झाल्याने मोठी चिंता निर्माण आहे. शासनाने आधी आमच्या कुटुंबाच्या जगण्याचा विचार करावा.
- अमोल आंबुलकर, दुकानदार
..
महिनाभर दुकान बंद राहिल्यास मोठी अडचण निर्माण होणार आहे. आधीच कर्ज आणि दुकानभाडे थकले आहे. प्रशासनाने मार्ग काढून आठवड्यातून काही दिवस तरी परवानगी द्यावी.
- राजू तळसंगे, दुकानदार
..
मी सलून कारागीर आहे. रोजच्या कमाईवर घर चालते. दुकानच बंद राहिल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह आम्ही कसा करायचा? घराचे भाडे, औषधोपचाराचा खर्च कुठून करायचा, रोजची चूल कशी पेटवायची?
- आशिष मेंढुले, कारागीर
....