निशांत वानखेडे
नागपूर : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय कर्मचारी संपावर गेल्याने प्रशासनिक व्यवस्था एकिकडे काेलमडली असताना आता दहावी बाेर्डाच्या परीक्षेवरही संकटाचे सावट पसरले आहे. परीक्षा केंद्रांवर परिरक्षक म्हणून नियुक्ती असलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी संपाला पाठिंबा देत परीक्षांवर बहिष्कार टाकण्याची घाेषणा केली आहे. त्यामुळे दहावीची परीक्षा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेनेही गुरुवारी नागपूर विभागीय बाेर्डाचे अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देत संपाची घाेषणा केली. ३ मार्चपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरु झाली आहे. नागपूर जिल्ह्यात शहरात ९६ आणि ग्रामीण भागात १२६ परीक्षा केंद्र आहेत. या परिक्षा केंद्रावर २५ अधिकाऱ्यांची परीरक्षक (कस्टोडियन) म्हणून नियुक्ती केली आहे. यापैकी २३ परीरक्षक हे शिक्षण विस्तार अधिकारीच आहेत. संघटनेने निवेदनातून सांगितले की, संघटनेने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपात सक्रीय सहभाग नोंदविलाच आहे.
त्यातच आता संघटनेच्या १६ मार्च २०२३ च्या सभेत ठरल्यानुसार २० मार्च पासून परिक्षा केंद्रावर परीरक्षक म्हणून उपस्थित न राहण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. परीरक्षक केंद्र कार्यालयाची चाबी हे विस्तार अधिकारी १८ मार्च २०२३ रोजी सायंकाळी नागपूर बोर्डाच्या अध्यक्षांकडे सुर्पूद करणार असल्याचे निवेदनातून सांगितले. यावेळी शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष विजय कोकोडे, संघटक कैलाश लोखंडे आणि कार्यकारी सदस्य रमेश हरडे उपस्थित होते.
संघटनेचा विद्यार्थी व पालकांना वेठीस धरण्याचा कुठलाही हेतू नाही. मात्र, शासनाकडून कर्मचारी हिताविरोधात धोरण राबविण्यात येत असल्याने संघटनेचा संपात सक्रीय सहभाग आहे. शासनाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा २० मार्चपासून पुढे हाेणाऱ्या सर्व परीक्षांवर बहिष्कार टाकण्यात येईल.- विजय काेकाेडे, अध्यक्ष, शिक्षण विस्तार अधिकारी संघटना
- बोर्डाकडे परिक्षेवर बहिष्कार घातल्यासंदर्भातील विस्तार अधिकारी संघटनेचे पत्र वाट्सअॅपवर प्राप्त झाले आहे. विस्तार अधिकाऱ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी कस्टडियन म्हणून नियुक्ती आहे. २५ ला परिक्षा संपत आहेत. यांच्या बहिष्कारामुळे मुलांना त्रास होईल. त्यांच्यासोबतच चर्चा करून ताेडगा काढण्याचा प्रयत्न करू.- रवींद्र काटोलकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद
संघटनेला संप मागे घेण्याबाबतचे पत्र देत आहोत. मुलांची परिक्षा महत्त्वाची आहे. परिक्षेनंतर आपण संपाबाबत विचार करावा अशी विनंती करण्यात येणार आहे. परिक्षेवर बहिष्कार टाकल्यास अडचण येईल, कारण पर्यायी यंत्रणा नाहीत. - रोहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी (प्राथ.)
त्यांच्यावर एस्मा लावू : बाेर्ड अध्यक्षबाेर्डाच्या परीक्षा या अत्यावश्यक सेवेचा भाग आहेत. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना परीरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून बहिष्काराची घाेषणा म्हणजे विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. त्यांनी संपाला पाठिंबा द्यावा पण परीक्षेवर बहिष्कार टाकू नये. नाईलाजाने त्यांच्यावर ‘एस्मा’ लावावा लागेल. त्याबाबतचे पत्र आम्ही त्यांना देणार.- चिंतामण वंजारी, अध्यक्ष, नागपूर विभागीय मंडळ