लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात काही दिवसांपूर्वी शिरलेला बिबट्या, त्यानंतर आढळलेले दुर्मीळ कासव या चर्चेच्या घटनांनंतर आता शहरातील नाल्यामध्ये मगरही आढळली आहे. यामुळे नागपूर शहरातील नालेही धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
धरमपेठमधील पत्रकार सहनिवासाला लागून असलेल्या नाल्यामध्ये काही युवकांना एक मगर थोडी पाण्याच्या वर येऊन आराम करीत असताना आढळली. या युवकांनी मगरीचा व्हिडिओ काढून व्हायरल केला. ही माहिती वन विभागापर्यंत पोहोचली. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे वेणा नदीतून जुळलेल्या नाल्यातून ही मगर आली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.
नाल्यात मगर असल्याची माहिती वन विभागापर्यंत पोहोचल्यावर वन विभागाच्या रेस्क्यू ऑपरेशनच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन दोन ते तीन वेळा पाहणी केली. मात्र, या पथकाला मगर आढळली नाही. या मगरीने अद्यापपर्यंत नागरिकांना उपसर्ग पोहोचविलेला नाही. नाल्यात फिरणारी डुकरे, भटके कुत्रे, त्यांची पिले तिच्यासाठी खाद्य म्हणून उपयोगात येत असावे, असा अंदाज आहे. अनेकजण मासे पकडण्यासाठी नाल्यावर जातात. मात्र, यामुळे शहरातील नाले धोकादायक झाल्याचे दिसत आहे.
१९८० मध्येही नागपुरात आढळली होती मगर !
गवळीपुरा लगतच्या नाल्यामध्ये आढळलेल्या मगरीमुळे नागपूरकरांमध्ये कुतूहल आणि आश्चर्य निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र असे असले तरी ही पहिली घटना नसून यापूर्वी १९८० मध्येही अशीच एक मगर सिव्हिल लाईन्समधील सेंट्रल टेलिग्राम ऑफीस आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सजवळील मैदानालगतच्या नाल्यात आढळली होती, अशी जुनी आठवण आहे. त्यावेळी वन विभागाच्या झिरो माईल्समध्ये कार्यालयात कार्यरत असलेले वन अधिकारी कांधे यांच्या नेतृत्वात मगरीला पकडण्याची मोहीम आखली होती, अशी आठवण आहे.