लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या पात्रात मागील २४ दिवसांपासून फिरत असलेली मगर शनिवारी सकाळी पुन्हा नागरिकांना वेगळ्या ठिकाणी दिसली. वनविभागाचे पथकही पोहोचले, परंतु दुपारनंतर तिचा ठावठिकाणा लागलाच नाही. मात्र दिवसभर बघ्यांची वर्दळ मात्र कायमच होती.
सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मोक्षधाम मागील परिसरात असलेल्या नदीच्या पात्रात असलेल्या मेट्रो पुलाच्या पिल्लरजवळील रेतीच्या ढिगाऱ्यावर ही मगर कोवळ्या उन्हात बसून असल्याचे काही नागरिकांना दिसले. पाहता पाहता गर्दी लोटली. अशातच आवाजाने विचलित झालेली मगर काही वेळातच वेगाने पात्रातील पाण्यात गेली. त्यानंतर ती पुन्हा रेतीवर आली नाही. दरम्यान, वन विभागाच्या सेमिनरी हिल्स रेस्क्यू पथकाला माहिती मिळाल्यावर ११.४५ वाजतानंतर पथक पोहोचले; मात्र या पथकाला मगर दिसली नाही.
शोध पथकाच्या मते, या मगरीचा हा मूळ अधिवास नसावा. कुणीतरी तिला येथे सोडले असावे, त्यामुळे ती याच परिसरात वावरत असल्याचा अंदाज आहे. यापूर्वी पहिल्यांदा ती पत्रकार सहनिवासालगतच्या पात्रात दिसली होती. शनिवारचे घटनास्थळ त्या ठिकाणापासून सुमारे अडीच किलोमीटर आहे. समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती डिवचल्यासारखी वेगाने रेतीच्या सपाट ढिगाऱ्यावरून पाण्यात उतरत असल्याचे दिसत आहे. यावरून ती याच परिसरात वावरत असावी, असा अंदाज आहे. नागरिकांनी पात्रात उतरणे टाळावे. मगर दिसल्यास तातडीने कळवावे, पथक पोहोचेपर्यंत कोलाहल न करता तिच्या हालचालीवर लक्ष ठेवावे, असे आवाहन नागपूर प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक भरतसिंग हाडा यांनी केले आहे.
पत्रकार सहनिवासासमोरील नाल्यासदृश पात्रातही ही मगर पहिल्यांदा दिसली होती. त्यानंतर ती अधूनमधून दिसत राहिली. तिच्या दिसण्यासोबतच फोटो आणि व्हिडिओही समाज माध्यमांवरून व्हायरल होत राहिले, तरी प्रत्यक्षात वन विभागाच्या पथकाला अद्यापतरी मगर दिसलेली नाही. दरम्यान, तिच्या शोधासाठी कॅमेरा ट्रॅपही लावण्यात आले होते, त्यातही तिचे छायाचित्र आले नाही. पत्रकार सहनिवासनंतर पुढे हे पात्र काही अंतरावर भूमिगत आहे. त्यात तिचा वावर असू शकतो, अशी शंका हाडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.