लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : मुसळधार पावसामुळे भिवापूर तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला आणि त्यातच उपसा सिंचन याेजनेच्या कालव्यात पाणी साचले. त्यामुळे या कालव्याची पाळ फुटल्याने तालुक्यातील मेढा व वडध शिवारातील कालव्यालगतच्या शेतात पाणी साचले व पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेंतर्गत गोसेखुर्द धरणातून पाण्याची उचल केली जाते व ते पाणी भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध करून दिले जाते. हा कालवा तालुक्यातील मेढा, वडध शिवारातून गेला आहे. दरम्यान, मंगळवारी पहाटेपासून तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे बहुतांश नदीनाल्यांना माेठा पूर आला. त्यातच या कालव्याची मातीची पाळ पहाटेच्या सुमारास फुटली आणि कालव्यातील पाणी लगतच्या शेतात साचले.
या पाण्यामुळे मेढा शिवारातील गुलाब गोडे, अनिल नागोसे व प्रमोद वैद्य यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले हाेते. आधीच सततच्या पावसामुळे पाण्याचा व्यवस्थित निचरा हाेत नाही. त्यात कालव्याची पाळ फुटल्याने पुन्हा भर पडली आहे. त्यामुळे शेतातील साेयाबीन, कपाशीसह अन्य पिके सडण्याची व नष्ट हाेण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
...
कालवा निरुपयाेगी?
या कालव्याचे पाणी अद्यापही सिंचनासाठी मिळाले नाही, असा आराेप मेढा व वडध शिवारातील शेतकऱ्यांनी केला असून, हा कालवा निरुपयाेगी तसेच नुकसानीस कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. या कालव्याचे ठिकठिकाणी मातीकाम करण्यात आले आहे. पावसामुळे या कालव्याची पाळ अन्य ठिकाणी फुटण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करावे व याेग्य नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
210921\img-20210921-wa0098.jpg
कालव्याची पाळ फुटल्यामुळे शेतांना असे तलावाचे रूप आले आहे.