लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे जाहीर केले. पंचनामेही झाले. परंतु या पंचनाम्याचा अहवाल अद्याप शासनाकडे पाठविण्यातच आला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई कशी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पूर व त्यानंतर परतीच्या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले. सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. परंतु प्रशासनाकडून याला बराच विलंब लागला. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पातळीवरून तालुका पातळीवर आवश्यक सूचनाच पाठविण्यात आल्या नाही. त्यामुळे पंचनामे करण्यास विलंब झाला. महसूल शाखेकडे माहिती गोळा करून अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्याची जबाबदारी आहे. परंतु त्यांच्याकडून योग्यरीत्या काम होत नसल्याचे सांगण्यात आले. विभागातील कर्मचारी महत्त्वाचे काम सोडून इतर कामात व्यस्त असतात. त्याचा परिणाम या कामावर होत असल्याचे सांगण्यात येते. कसेबसे पंचनामे पार पडले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्यापूर्वी सर्वच नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल पाठवायचा होता. तशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आल्या. परंतु अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या आदेशाला कानाडोळा करण्यात आला. यामुळे नुकसानीचा अहवाल वेळेत शासनाकडे सादर झाला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानासाठी दोन हेक्टरपर्यंत हेक्टरी १० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वीच देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. अहवालास उशीर झाल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब होणार आहे.