साैरभ ढाेरे
नागपूर : राज्य सरकारने पंतप्रधान पीक विमा याेजनेंतर्गत खरीप व रबी पिके, तसेच फळपिकांचा विमा एक रुपयात काढण्यात येणार असल्याची घाेषणा केली हाेती. विम्याच्या हप्त्यातील शेतकऱ्यांच्या वाट्याच्या रकमेचा भरणाही राज्य सरकार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले हाेते. संत्रा फळपीक विमा काढण्याची मुदत संपली असून, माेसंबी फळपीक आणि खरीप पिकांचा विमा काढण्याची प्रक्रिया सुरू असली तरी राज्य सरकारने याबाबत ‘जीआर’ काढला नसल्याने शेतकऱ्यांना नियमानुसार हप्त्याच्या रकमेचा भरणा करून पीक विमा काढावा लागत आहे.
नरखेड, काटाेल, कळमेश्वर, सावनेर तालुक्यांतील संत्रा व माेसंबी उत्पादक फळपीक विमा काढतात, तर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी खरीप व रबी पिकांचा नियमित विमा काढतात. केंद्र सरकारने नागपूर जिल्ह्यातील फळपिकांच्या शेतकऱ्यांच्या वाट्यात आधीच माेठी वाढ केली आहे. त्यातच राज्य सरकारने सर्व पीक विमा एक रुपयात काढण्याची घाेषणा केली. यासाठी ३,३१२ काेटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
याबाबत राज्य सरकारने अद्याप कुठलाही जीआर काढला नसल्याने शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे विम्याच्या हप्त्याची रक्कम भरून पीक विमा काढावा लागत आहे. विशेष म्हणजे, संत्रा फळपीक विमा काढण्याची अंतिम तारीख १४ जून हाेती, तर माेसंबी फळपीक विमा काढण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. शिवाय, खरीप पिकांचा विमा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. एक रुपयात पीक विमा याबाबत राज्य सरकारचा जीआर कुणालाही प्राप्त न झाल्याने ही याेजना केवळ कागदावरच असून, त्याचा राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा आराेप शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मदन कामडे यांनी केला आहे.
नियमानुसार हप्ते भरा
बहुतांश शेतकरी पीककर्ज घेताना पीक विमा काढतात. एक रुपयात पीक विमासंदर्भात कुठलाही जीआर अथवा राज्य सरकारचा आदेश आपल्याला अद्याप प्राप्त झाला नाही. शेतकरी विचारणा करीत असल्याने आपण पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनाही याबाबत कुठलाही आदेश नाही. कंपनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आपण शेतकऱ्यांकडून नियमानुसार विम्याच्या हप्त्याची रक्कम स्वीकारून पीक विमा काढत आहाेत, अशी माहिती राष्ट्रीयीकृत बँकांच्या काही व्यवस्थापकांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक रुपयात पीक विमा ही घाेषणा केली; परंतु त्यांनी अद्याप जीआर काढला नाही. त्यामुळे आपण नियमानुसार विमा हप्त्याच्या रकमेचा भरणा करून संत्रा व इतर पिकांचा विमा काढला आहे. राज्य सरकारने याबाबत तातडीने जीआर काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
-चंद्रशेखर कोल्हे,
शेतकरी तथा माजी जि.प. सदस्य, काटाेल
संत्रा फळपीक विमा मागील वर्षीप्रमाणेच यंदाही काढावा लागला. विम्याच्या हप्त्यापाेटी चार हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे दाेन हेक्टरचे आठ हजार रुपये विमा कंपनीला दिले. हा संत्र्याच्या मृग बहाराचा विमा आहे. आंबिया बहारासाठी वेगळा विमा काढावा लागणार आहे. त्यासाठी प्रतिहेक्टर २० हजार रुपयांचा हप्ता विमा कंपनीला द्यावा लागेल.
-मनाेज जवंजाळ,
संत्रा उत्पादक शेतकरी, काटाेल