कामठी : कोरोना संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी खरीपाची तयारी सुरू केली आहे. विविध बँकामध्ये कर्जासाठी उंबरठे झिजवत आहेत. अशा संकटाच्या काळातही पीक कर्जवाटपात राष्ट्रीयकृत बँका माघारल्याचे दिसत आहे. कामठी तालुक्यात उद्दिष्टाच्या केवळ १० टक्के कर्जाचे वाटप झाले आहे. त्यामुळे वेळेवर पीक कर्ज मिळाले नाही तर शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
खरीप हंगामासाठी तालुक्यातील राष्ट्रीयकृत, खासगी आणि जिल्हा बँकेच्या शाखेला ३४ कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १५ एप्रिलपासून कर्ज वितरणाला प्रारंभ झाला. आतापर्यंत केवळ ३०२ शेतकऱ्यांना ३ कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. उद्दिष्टाच्या १० टक्केच कर्ज वितरण झाले आहे. तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या १५ तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४ शाखा आहेत. अशा एकूण १९ बँकांना ३४ कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी राष्ट्रीयकृत बँकांना ३२ कोटी ६ लाख रुपये तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना २ कोटी ३६ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी केवळ ३ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सध्या तालुक्यात नियमित पीककर्जधारक शेतकऱ्यांची संख्या २८५ तर नवीन पीक कर्जधारक शेतकऱ्यांची संख्या १७ आहे.
कडक निर्बंधाचा फटका
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले होते. त्यामुळे बँकाचे कामकाजही बंद ठेवण्यात आले होते. त्याचा परिणाम पीक कर्ज वाटपावरही झाला आहे. खरीप हंगामास सुरुवात झाली असताना जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे.
रबीतही बसला फटका
गतवर्षी खरीप हंगामात अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानातून सावरत शेतकऱ्यांनी रबी हंगामाची तयारी केली. रबीतही शेतकऱ्यांना फारसे उत्पादन झाले नाही. अनेक शेतकऱ्यांना कडक निर्बंधामुळे शेतमालाची विक्री करता आली नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा मोठा आधार असतो.
--
बुधवारी सर्व बँक अधिकाऱ्यांची पीककर्ज आढावा बैठक घेण्यात आली. अधिकाऱ्यांना पीककर्ज वाटपाबाबत सूचना देण्यात आल्या. बँकांना जे लक्ष्यांक दिले आहे त्याप्रमाणे पीक कर्ज वाटप करण्याचे तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी त्वरित निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- अरविंद हिंगे
तहसीलदार, कामठी तालुका