नागपूर : पदाचा दुरुपयोग करून कर्मचारी सहकारी पतसंस्थेला सव्वाचार कोटींचा गंडा घालणाऱ्या सिंधी हिंदी स्कूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या तीन माजी पदाधिकाऱ्यांना अखेर गुन्हेशाखेने जेरबंद केले. जयंत विशनदास तोलानी (वय ५९, रा. जरीपटका), हुंदाराज माणिकराय तोलानी (वय ५४, रा. हुडको कॉलनी) आणि भागचंद अर्जुनदास चेलानी (वय ६२, रा. हिंगणा टी पॉर्इंट) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर करून त्यांची २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीही मिळवली. पाचपावलीत सिंधी हिंदी हायर सेकंडरी स्कूल कर्मचारी सहकारी पतसंस्था आहे. संस्थेचे ४०० सभासद असून, आरोपी भागचंद चेलानी हे प्रारंभी संस्थेचे सचिव होते. त्यानंतर लेखापाल जयंत तोलानी यांनी सचिवपदाचा कार्यभार सांभाळला. या दोघांसोबत त्यावेळी हुंदाराज तोलानी रोखपाल होते. २००० ते २००८ या कालावधीत या तिघांनी बनावट कागदपत्रे आणि नोंदी करून ८ वर्षात ४ कोटी, १७ लाख, ७५ हजारांची अफरातफर केली. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर इतर सभासदांनी २००९ मध्ये पाचपावली ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरण कोट्यवधींच्या फसवणुकीचे असल्यामुळे त्याचा तपास गुन्हेशाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्या अटकेची तयारी करताच आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. प्रकरण उच्च न्यायालयात नेले. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन नामंजूर केला. (प्रतिनिधी) ६ वर्षानंतर आरोपींना अटक या प्रकरणाची माहिती कळताच गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुरेश मदने, शिपाई गजानन शिंदे, अर्चना विलायतकर यांनी शोधाशोध करून तिघांनाही अटक केली. त्यांना कोर्टात हजर करून त्यांची २२ एप्रिलपर्यंत कोठडी मिळवली. त्यामुळे ६ वर्षांपासून रेंगाळत असलेल्या या प्रकरणातील बाबी आता उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सव्वाचार कोटींची अफरातफर
By admin | Published: April 18, 2015 2:32 AM