नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाची भीती कमी झाली असून, बाजारात दरदिवशी होऊ लागलेल्या गर्दीवरून ते दिसून येत आहे. नागरिक किराणा आणि भाजीबाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी करू लागले आहेत. दरदिवशी बाजारपेठांमध्ये वाढणारी गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पूर्वसंकट तर नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रतिनिधीने सकाळी सक्करदरा, नंदनवन, रमणा मारोती आणि सोमवारी (दि. १७) क्वार्टर येथील भाजी आणि किराणा दुकानांची पाहणी केली. सर्वत्र नागरिकांची गर्दी दिसून आली. सोमवारी क्वार्टर भाजीबाजारात पाय ठेवायलाही जागा नव्हती. मास्क, सॅनिटायझर वा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना कुणीही दिसले नाही. दुकानदारांनीही दुकानातील माल थेट रस्त्यावरच लावला होता. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहत असल्याने भाज्यांच्या विक्रीसाठी दुकान पुढे लावल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. दररोज विक्रीसाठी आणलेल्या भाज्यांपैकी ४० ते ५० टक्के भाज्यांची विक्री होते. त्यातील काही माल खराब होतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने भाज्या आणून पहिल्या दिवशी उरलेल्या भाज्यांसोबत विक्री करावी लागते. वेळेचे बंधन असल्याने कोरोनाची भीती न बाळगता जिवावर उदार होऊन व्यवसाय करावा लागतो. गर्दीवर नियंत्रण करायला महापालिकेचे कुणीही कर्मचारी दिसले नाहीत. त्यामुळे दुकानदारांना रान मोकळे मिळाले होते. सकाळी ११ पूर्वी विक्रेत्यांनी भाज्यांची विक्री बंद करायला सुरुवात केल्याचे दिसून आले. अशीच बाब नंदनवन, केडीके कॉलेज आणि रमणा मारोती या परिसरातील भाजीबाजाराची होती. शिवाय फळांच्या दुकानांतही गर्दी दिसून आली.
याशिवाय किराणा दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी होती. वेळेचे बंधन असल्याने सर्वच ग्राहक माल लवकर मिळावा म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसले नाहीत; याशिवाय दुकानदार सर्वांना दूर उभे राहण्याचे आवाहन करीत होते; पण कुणीही ऐकण्याच्या स्थितीत दिसले नाहीत. सकाळी नऊ वाजल्यापासून झालेली गर्दी सकाळी ११ पर्यंत होती. अखेर दुकाने बंद झाल्यानंतर गर्दी ओसरली. तसेच पूर्व नागपुरातील सर्वच किराणा दुकानांमध्ये दरदिवशी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागतील, असे नागरिकांनी सांगितले.