लाेकमत न्यूज नेटवर्क
खात : सण आणि मार्च एन्डिंगमुळे बँका एक दिवस वगळता नऊ दिवस बंद राहणार असल्याचा मॅसेज काही दिवसापासून साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. त्यामुळे बँक खातेदारांनी खात (ता. माैदा) येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी गर्दी केली हाेती. बँक शाखेसमाेर सकाळी १० वाजतापासून तर बँक बंद हाेईपर्यंत खातेदारांच्या रांगा लागल्या हाेत्या. या प्रकारामुळे बँक कर्मचारीही त्रस्त झाले हाेते.
बँक ग्राहकांना महत्त्वाची सूचना, २७ मार्चपासून एकच दिवस बँक चालू राहणार आहे. तरी आपले बँकेतील कामकाज अगाेदर करून घ्यावेत. आपल्या माहितीसाठी २७ मार्च (शनिवार) सुटी, २८ मार्च (रविवार) सुटी, २९ मार्च (सोमवार) होळी सुटी, ३० मार्च (मंगळवार) बँक चालू राहील, ३१ मार्च (बुधवार) मार्च एन्डिंग सुटी, १ एप्रिल (गुरुवार) बँक कामकाज बंद, २ एप्रिल (शुक्रवार) गुड फ्रायडे सुटी, ३ एप्रिल (शनिवार) बँक बंद, ४ एप्रिल (रविवार) बँक सुटी, अशा आशयाचा मॅसेज साेशल मीडियावर बराच व्हायरल झाला.
हा मॅसेज अनेकांच्या वाचण्यात गेल्याने त्यांनी रकमेची उचल करण्यासाठी खात येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गर्दी केली हाेती. वास्तवात ग्रामीण भागात एटीएमची संख्या कमी असल्याने तसेच जे एटीएम आहेत, त्यात रकमेचा नेहमीच ठणठणाट राहत असल्याने खातेदारांना रकमेची उचल करण्यासाठी बँकेत जाण्यावाचून गत्यंतर नसते. त्यामुळे बँकेत शुक्रवारी खातेदारांची गर्दी बघायला मिळाली. खातेदारांची कामे करताना बँक कर्मचारीही त्रासले हाेते.