लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : हाेळीनिमित्त दारूची दुकाने बंद राहणार असल्याची माहिती सर्वत्र पसरताच वाडी शहरातील शाैकिनांनी दारूच्या बाटल्या खरेदी करण्यासाठी दुकानांसमाेर माेठी गर्दी केली हाेती. या गर्दीत ८५ ते ८७ टक्के नागरिक विना मास्क हाेते तर कुणीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नव्हते. नागरिकांचा हा आतातायीपणा काेराेना संक्रमणास कारणीभूत ठरण्याची शक्यता जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली असून, प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले हाेते.
वाडी हे नगर परिषदेचे शहर असून, येथे दारू दुकानांची संख्याही समाधानकारक आहे. मागील काही दिवसांपासून नागपूरसह वाडी शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे संक्रमणाची साखळी ताेडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी आठवडाभराचा लाॅकडाऊनही जाहीर केला हाेता. हा लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून काही निर्बंध कायम ठेवले. मध्यंतरी अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने आठवडाभर व नंतर शनिवार व रविवारी बंद ठेवण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले हाेते.
हाेळी रविवारी तर धूलिवंदन साेमवारी असल्याने तसेच दारूची दुकाने शनिवार, रविवारी व साेमवारी बंद राहणार असल्याचा नागरिकांचा समज झाला आणि शाैकिनांनी शुक्रवारी (दि. २६) दारूच्या बाटल्या खरेदी करण्यासाठी दुकानांसमाेर गर्दी केली हाेती. शहरातील बहुतांश दारूच्या दुकानांसमाेर माेठी गर्दी आणि या गर्दीत काेराेना उपाययाेजनांचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून आले. प्रशासनाने मात्र या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले हाेते.