हायकोर्ट : १८ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणीनागपूर : रामटेक गडमंदिर व तेथील विविध स्मारकांच्या संरक्षण, जतन व दुरुस्तीसंदर्भातील प्रकरणात नवी दिल्ली येथील सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटला (सीआरआरआय) प्रतिवादी करण्यात आले आहे. याप्रकरणावर १८ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.शासनाच्या प्रतिज्ञापत्रानुसार, रामटेक गडमंदिर व तेथील विविध स्मारकांच्या संरक्षण, जतन व दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यात वराह मंदिरासाठी ७० लाख २९ हजार २९० रुपये, कपटराम मंदिर व धुम्रेश्वरद्वारासाठी ८५ लाख ३२ हजार ४४७ रुपये, केवल नरसिंह मंदिरासाठी ७१ लाख ३१ हजार ९३७ रुपये, रुद्र नरसिंह मंदिरासाठी १४ लाख २२ हजार ८७६ रुपये तर, भैरव व वराह दरवाजासाठी ४७ लाख ५२ हजार ६५६ रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे. या कामासाठी ‘सीआरआरआय’चे मार्गदर्शन आवश्यक आहे. यामुळे या संस्थेला प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले आहे. देशाचा ऐतिहासिक वारसा असलेले गडमंदिर देखभालीअभावी जीर्ण झाले आहे़ मंदिराचे जतन, देखभाल व विकास कामांना आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी अमित खोत यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात वरिष्ठ वकील आनंद जयस्वाल न्यायालय मित्र आहेत.(प्रतिनिधी)
गडमंदिराच्या प्रकरणात सीआरआरआय प्रतिवादी
By admin | Published: February 08, 2016 3:21 AM