लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - क्रूरकर्मा आलोक उर्फ चंदू अशोक मातुरकर (वय ४५) हा अंधविश्वासू होता. तो जादुटोणा आणि तंत्रमंत्रासह अघोरी विद्येकडे वळला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे.
सैराट झालेली मेव्हणी, सासू, पत्नी, मुलगी आणि मुलगा अशा पाच जणांची हत्या करणाऱ्या आरोपी आलोकने स्वता आत्महत्या करुन राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात आरोपीने आत्महत्या केल्याने प्रकरणाचा तपास, पुरावे गोळा करण्याचा प्रकार मर्यादित झाला आहे. मात्र, थरारून सोडणाऱ्या या अमानूष हत्याकांडामागची आरोपीची मानसिकता तपासण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्येक मुद्दा स्वतंत्रपणे तपासणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर, आलोक आणि अमिषाच्या संपर्कातील सुमारे दोन डझन व्यक्ती पोलिसांनी अधोरेखित केले आहेत. त्यांच्याकडे विचारपूस सुरू आहे. नागपूरच नव्हे तर अमरावतीच्या त्याच्या वास्तव्यादरम्यान घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींची माहितीही पोलिसांनी संकलित करणे सुरू केले आहे. त्याने बँकेत कर्जाचे आवेदन देण्यापासून तो कर्ज घेण्यापर्यंत आणि हप्ते भरण्यापासून तो थकविण्यापर्यंतच्या मुद्यांचीही पोलिसांनी चाैकशी चालविली आहे. त्यातूनच आरोपीच्या अंधश्रद्धाळूपणाचा आणि अघोरी विद्येकडे वळल्याचा धक्कादायक पैलू उघड झाला आहे. खास सूत्रांच्या माहितीनुसार, आलोकने बँकेत कर्ज प्रकरणासाठी जी कागदपत्रे सादर केली. त्यांना त्याने हळदी-कुंकू लावले होते. अमरावतीतील बँकेच्या एका अधिकाऱ्याने हा प्रकार उघड केल्याचे समजते. दुसरे म्हणजे, त्याच्या घरी एक भलेमोठे लाल पिवळ्या धाग्याचे बंडल आढळले आहे. दुसऱ्या एका खास सूत्रांच्या माहितीनुसार, अमिषाच्या उशी (तकिया) खाली एक हळदकुंकू लावलेले लिंबू आढळले होते. या संबंधाने एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लोकमतने विचारणा केली असता त्यांनी मात्र ‘लिंबू’च्या मुद्याचा इन्कार केला. त्यामुळे या प्रकाराचे रहस्य गडद झाले आहे.
---
त्याच्यामुळे नव्हे तिच्याचमुळे वाद
या हत्याकांडानंतर क्रूरकर्मा आलोकचे सैतानी रूप पुढे आले असले तरी आधी तो घरच्या दारच्या सर्वांच्याच नजरेत सालस होता. आजूबाजूची मंडळीही त्याला शांत स्वभावाचाच समजत होती. अमिषा मात्र सैराट झाली होती. त्यामुळे घरची मंडळी आलोकमुळे नव्हे तर अमिषामुळे हैराण परेशान होती. घटनेच्या रात्री तिच्याच वर्तनामुळे त्रागा करीत सासू लक्ष्मीबाई आलोकच्या घरी आली आणि ‘ती घरी आहे, तिला जाऊन समजवा’,असे म्हणत सासूनेच आलोकला आपल्या घरी पाठवले. त्यानंतर हे आक्रित घडले.
---
आमिषाचा माफीनामा
पोलिसांनी आरोपी आलोक आणि आमिषाच्या घरात काही कागदपत्रे आणि चिठ्ठ्याही जप्त केल्या. त्यात एक माफीनामा लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांच्या हाती लागली. ती आमिषाने लिहिली असावी, असा संशय आहे. ती वारंवार घरून निघून जात होती. त्यातून तिच्यासोबत घरच्यांचे खटके उडायचे. अशाच प्रकारे ती एकदा घरून निघून गेली आणि परत आल्यानंतर तिने माफीनामा वजा चिठ्ठी दिली. यापुढे कधीच घरून पळून जाणार नाही, असे या चिठ्ठीत लिहून असल्याचे समजते.
---