क्रूरकर्मा सूरज शाहूला दुहेरी जन्मठेप, सत्र न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 11:08 AM2023-06-23T11:08:06+5:302023-06-23T11:11:26+5:30

निरागस बालक राज पांडेचा मारेकरी

Cruel Suraj Sahu sentence of Double Life Imprisonment, Sessions Court Verdict | क्रूरकर्मा सूरज शाहूला दुहेरी जन्मठेप, सत्र न्यायालयाचा निर्णय

क्रूरकर्मा सूरज शाहूला दुहेरी जन्मठेप, सत्र न्यायालयाचा निर्णय

googlenewsNext

नागपूर : १५ वर्षीय निरागस बालक राज पांडे याचा मारेकरी क्रूरकर्मा सूरज रामभुज शाहू (२५) याला गुरुवारी खंडणीसाठी अपहरण (भादंवि कलम ३६४-अ) व खून (भादंवि कलम ३०२) या दोन्ही गुन्ह्यांतर्गत जन्मठेप व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी हा निर्णय दिला. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले होते. आरोपीला कडक शिक्षा होण्याची प्रतीक्षा सर्वजण करीत होते.

आरोपी दोन्ही जन्मठेप सोबत भोगेल, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. आरोपीने दंडाची रक्कम जमा केल्यास, ती रक्कम राजच्या आईला अदा करण्यात यावी. तसेच, त्यांना फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३५७-ए अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणला अर्ज सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. आरोपी ११ जून २०२१ पासून कारागृहात आहे. न्यायालयाने त्याला या दोन्ही गुन्ह्यांमध्ये गेल्या ५ जून रोजीच दोषी ठरविले होते. दरम्यान, आरोपीच्या शिक्षेवर सुनावणी झाली व त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय राखीव ठेवला होता.

राज व आरोपी सूरज एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील इंदिरा मातानगर वस्तीत राहत होते. दोघांचीही एकमेकांसोबत चांगली ओळख होती. घटनेच्या काही दिवसांपूर्वी राजचे काका मनोज पांडे यांनी सूरजच्या आईचा अपमान केला होता. त्यामुळे सूरज चिडला होता. त्यानंतर त्याने आईच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी राजच्या अपहरणाचा कट रचला. १० जून २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता त्याने राजला क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेले व सायंकाळी ६ वाजता राजची आई गीता यांना फोन करून मनोज पांडे यांचे मुंडके कापून त्याचा फोटो व्हॉटस्ॲपवर पाठविण्याची मागणी केली, तसेच, मागणी पूर्ण न केल्यास राजला ठार मारण्याची धमकी दिली.

परिणामी, राजचे वडील राजकुमार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. दरम्यान, पोलिसांनी वेगवान हालचाली करून मध्यरात्रीनंतर सुमारे २ वाजता वर्धा जिल्ह्यातील बोरखेडी येथून सूरजला ताब्यात घेतले. सखोल विचारपूस केल्यानंतर सूरजने राजचा खून केल्याची माहिती दिली. सूरजने राजला सालई शिवारातील गोविंदराव वंजारी महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या निर्जन ठिकाणी नेले होते. त्या ठिकाणी त्याने सुरुवातीस राजला दगडाने मारून गंभीर जखमी केले व त्यानंतर सर्जिकल ब्लेडने त्याच्या हाताची नस कापली. त्यामुळे राज जागेवरच मरण पावला.

एमआयडीसीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक (गुन्हे) दिनेश लबडे यांनी प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेत तातडीने व प्रभावीपणे तपास पूर्ण केला आणि अवघ्या २२ दिवसांमध्ये न्यायालयात खटला दाखल केला होता. यासाठी न्यायालयाने त्यांची प्रशंसा केली.

सरकार फाशीसाठी अपील करणार

आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये अपील दाखल करेल, अशी माहिती या खटल्याचे कामकाज पाहणारे विशेष सरकारी वकील ॲड. विजय कोल्हे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. आरोपीने राजला अत्यंत निर्दयीपणे, क्रूरपणे व थंड डोक्याने ठार मारले. त्यानंतर राजच्या आईला मनोज पांडे यांचा खून करण्याची खंडणी मागितली. आजपर्यंत कोणत्याही गुन्हेगाराने अशाप्रकारची खंडणी मागितली नाही. त्यामुळे हे दुर्मिळातले दुर्मीळ प्रकरण आहे. आरोपीला फाशी होणे आवश्यक आहे, असे ॲड. कोल्हे यांनी सांगितले.

आरोपीविरुद्ध आहेत ठोस पुरावे

  • आरोपी सूरजने राजच्या आईला केलेल्या धमकीच्या फोनचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. त्यातील आवाज व आरोपीचा आवाज एकच असल्याचे तांत्रिक तपासणीत आढळून आले आहे.
  • आरोपी सूरज हा राजला दुचाकीवर बसवून सालई शिवाराकडे जात असताना पेट्रोल पंपासह तीन ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. तांत्रिक तपासणीतही हे सिद्ध झाले आहे.
  • आरोपी सूरज व राज यांना दुचाकीवर बसून जाताना एका साक्षीदाराने पाहिले आहे. तसेच, आरोपीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांना राजचा मृतदेह मिळून आला.
  • आरोपीच्या कपड्यांवर राजच्या रक्ताचे डाग होते. यासंदर्भात पोलिसांकडे पॉझिटिव्ह डीएनए अहवाल आहे.
  • आरोपी सूरज घटनेच्या वेळी घटना परिसरामध्ये हजर होता, हे मोबाइल टॉवर लोकेशनवरून सिद्ध झाले.

Web Title: Cruel Suraj Sahu sentence of Double Life Imprisonment, Sessions Court Verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.