नागपूर : देशातील महिलांच्या कर्तृत्वामुळे एकीकडे चंद्रयान यशस्वीपणे चंद्रावर पोहोचले असतानादेखील समाजातील काही लोकांची मानसिकता मात्र बुरसटलेलीच आहे. याच मानसिकतेतून ते स्त्रीजातीला खेळणे समजून वाट्टेल ती क्रौर्याची सीमा गाठतात. असाच एक संतापजनक आणि अंगावर शहारे आणणारा प्रकार नागपुरात घडला आहे.
गरिबीचा फायदा घेत पालकांकडून खरेदी केलेल्या १0 वर्षांच्या मुलीला घरकामाला जुंपल्यावर एका कुटुंबातील सदस्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. इतकेच नाही तर तिला अनेकदा गुप्तांगासह अंगावर सगळीकडेच तवा-सिगारेटचे चटके दिले आणि चक्क तिला एका अंधाऱ्या खोलीत अन्नपाण्याविना तडफडत सोडून बंगळुरूची सैर करायला निघून गेले. काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार २९ ऑगस्ट रोजी समोर आला आणि घटनास्थळावर पोहोचलेल्या नागरिकांसह पोलिसांच्या डोळ्यांतूनदेखील पाणी निघाले.
सैतानालाही लाजवेल अशीही घटना बेसा-पिपळा मार्गावरील अथर्व नगरी-३ मधील घर क्रमांक ११ येथे घडली आहे. अरमान इश्ताक अहमद खान (३९) हा त्याची पत्नी हीना (२६), मेहुणा अजहर व सहा तसेच आठ वर्षांच्या दोन मुलींसोबत राहतो. बंगळुरूमधील असलेले हे कुटुंब व्यवसायानिमित्त येथे स्थानिक झाले आहेत.
बंगळुरूमधील हलाखीच्या परिस्थितीतील एका कुटुंबातील मुलीला त्यांनी दोन वर्षांअगोदर नागपुरात आणले. तिला शिक्षण देऊ, वाढवू असे म्हणत त्यांनी तिला आणले. प्रत्यक्षात ते तिच्याकडून घरकाम करवून घेऊ लागले. तिने काही चूक केली तर अगोदर ते तिला रागवायचे. मात्र त्यानंतर त्यांनी क्रूरपणे वागायला सुरुवात केली व तिला मारहाण करायला लागले. तिघेही जण तिला लहानसहान चुकांवर तवा, सराटा किंवा सिगारेटचे चटके द्यायचे. अगदी तिच्या गुप्तांगाला चटके देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. मुलगी मुकाट्याने हा छळ सहन करत होती. त्यातच तिच्यावर दोघांनीही अत्याचार करणे सुरू केले.
अरमान व अजहर दोघेही तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध आणि अनैसर्गिक संबंध ठेवत होते. अगदी लाटणे, चमचा यांचा उपयोग करत क्रूरपणे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. हे लोक २४ ऑगस्ट रोजी बंगळुरूला गेले व जाताना मुलीला घरातील एका कोंदट खोलीत कोंडून गेले. जाताना केवळ काही ब्रेडची पाकिटे ठेवली होती. मुलगी भूकतहानेने व्याकूळ होऊन खोलीत बसली होती. अचानक दोन दिवसांअगोदर वीज विभागाचे कर्मचारी वीज कापण्यासाठी आले. अंधार झाल्याने भेदरलेल्या मुलीने हिंमत करून खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
वेदना ऐकून पोलिस, डॉक्टरदेखील शहारले
परिसरातील काही लोकांनी मुलीला खायला दिले व तिचे कपडे बदलण्यासाठी घेऊन गेले. तिचे कपडे बदलत असताना अत्याचाराच्या खुणा दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. हुडकेश्वर पोलिस ठाण्यातील पथक तेथे पोहोचले. ज्यावेळी त्यांनी मुलीची आपबीती ऐकली तेव्हा त्यांच्या अंगावरदेखील काटा उभा राहिला. तीनही आरोपींनी तिला नको त्या ठिकाणी, छातीवर अनेकदा चटके तर दिलेच होते. तसेच काही ठिकाणी चावल्याच्यादेखील खुणा होत्या. स्वत:ची दोन लहान मुले असतानादेखील त्यांना मुलीच्या वेदनेचा विचार आला नाही. मुलीची वैद्यकीय तपासणी करत असताना डॉक्टरांनादेखील धक्काच बसला. जागोजागी जखमा होत्या.
भेदरलेली नजर, कशी मिळणार वेदनेवर फुंकर
संबंधित मुलीने लहानपणापासून दारिद्र्यच पाहिले आहे. पैशांसाठीच तिच्या पालकांनी तिला या क्रूर कुटुंबाच्या स्वाधीन केले. सातत्याने विविध प्रकारे अन्याय, अत्याचार झेलणाऱ्या मुलीची नजर या प्रकारानंतर शून्यात होती. तिच्या शरीरावर वैद्यकीय उपचार सुरू असले तरी तिच्या मनाच्या वेदनेवर फुंकर कशी घालणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. भेदरलेल्या नजरेने ती आश्वासक चेहरा शोधत असताना दिसून आली. सुरुवातीला तिला नीट माहितीदेखील देता आली नाही.
परिसरातील नागरिकांमध्ये संताप
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्येदेखील संतापाचे वातावरण आहे. संबंधित कुटुंब जगासमोर मुलीशी ठीक वागत होते. मात्र ज्या पद्धतीने मुलगी नेहमी घाबरल्यासारखी राहायची त्यावरून अनेकांना ही बाब खटकायची. क्रौर्याचा हा प्रकार ऐकून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही आरोपीला धडा शिकवू अशीच अनेकांची भावना होती. संबंधित मुलीकडून आरोपी अगदी मुलांची विष्ठा, उलटीदेखील साफ करवून घ्यायचे. जिला ती ‘हीनादीदी’ म्हणायची तीच तिच्या आयुष्याशी खेळ करत होती.