नागपूर : गुजरातमध्ये समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या गोडाऊनमधील पांढऱ्या कांद्याचा अर्धा स्टॉक पावसामुळे खराब झाल्यामुळे या ठिकाणाहून आवक बंद झाली आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्यातून पांढऱ्या कांद्याची आवक लालच्या तुलनेत कमी असल्यामुळे किरकोळ भाव आकाशाला भिडले आहेत. विदर्भात सर्वाधिक विकला जाणारा पांढरा कांदा सणासुदीत गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणत आहे.
महागाईत खाद्यतेल आणि भाज्यांसह कांद्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे अनेकांचे महिन्याचे बजेट वाढले आहे. कळमना आलू-कांदे होलसेल बाजारात लाल आणि पांढऱ्या कांद्याची दररोज एकत्रित २२ ते २५ ट्रकची आवक आहे. त्यात केवळ दोन ते तीन ट्रक पांढऱ्या कांद्याचे आहेत. कळमन्यात दर्जानुसार भाव २० ते २७ रुपये किलो असून किरकोळमध्ये ५० ते ६० रुपये दराने विक्री होत आहे. भाववाढीमुळे अनेकांनी पांढरे कांदे खरेदीकडे कानाडोळा केल्याचे बाजारात चित्र आहे. दोन महिन्यांपूर्वी १२ ते १६ रुपये भाव होते, हे विशेष. नवीन कांदे पुढील १५ दिवसांत सोलापूर येथून कळमन्यात विक्रीसाठी येतील.
लाल कांद्याची आवक सातारा, अहमदनगर, बुलडाणा, चाळीसगाव आणि थोडीफार नाशिक जिल्ह्यातून होत आहे. नवीन कांदे कर्नुल (आंध्र प्रदेश) जिल्ह्यातून येत आहेत. कळमन्यात जवळपास २० ट्रकची आवक आहे. भाव १० ते १२ रुपये किलो तर जुन्या कांद्याचे भाव १७ ते १८ रुपये आहेत. किरकोळमध्ये भाव ४० रुपयांवर पोहोचले आहेत. नवीन लाल कांद्याची आवक १५ दिवसांत बंगळुरू येथून होणार आहे. त्यानंतरच थोडेफार भाव कमी होण्याची शक्यता कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवात कांद्याचे भाव कमी असतात, असा नेहमीचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात जुन्या लाल कांद्याचा स्टॉक मोठ्या प्रमाणात असल्याचे ते म्हणाले.
बटाट्याचे भाव कमीच
यंदा उत्तर प्रदेशात बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणात निघाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमीच आहे. कळमन्यात आग्रा आणि कानपूर येथून दररोज २२ ते २५ ट्रकची आवक आहे. होलसेलमध्ये १० ते १२ रुपये किलो भाव असून किरकोळमध्ये जास्त दरात विक्री होत आहे. याशिवाय लसणाचे भाव सध्या कमी झाले आहेत. दररोज राजस्थान (कोटा) आणि मध्य प्रदेश (उज्जैन) येथून दोन ते तीन ट्रकची आवक आहे. कळमन्यात दर्जानुसार ५० ते ७५ रुपये किलो भाव असून किरकोळमध्ये जास्त दरात विक्री करण्यात येत आहे.