गोळी घालून ठार मारले : गुन्हेशाखेने केला उलगडा
---------
तिघांना अटक, सूत्रधारासह तिघे फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून वाद निर्माण झाल्यानंतर सहा जणांनी मिळून एका व्यक्तीचे नागपुरातून अपहरण केले आणि त्याची मालेगाव (जि. वाशिम) जवळ हत्या केली. १२ सप्टेंबरला ही घटना उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने व्हायरल फोटोच्या आधारे मृताची ओळख पटवून या हत्याकांडाचा छडा लावला. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार आणि त्याच्या मैत्रिणीसह तिघे फरार आहेत.
माधव यशवंत पवार (वय ३८) असे मृताचे नाव आहे. तो खरबीतील साईबाबा नगरात राहत होता. निशिद महादेव वासनिक (रा. आराधनानगर) हा या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार आहे. तो क्रूर गुन्हेगार म्हणून ओळखला जातो.
पवार मूळचा सोलापूरचा रहिवासी होय. तो सात ते आठ वर्षांपूर्वी आरोपी निशिद वासनिकसोबत बिट क्वाईनच्या गोरखधंद्यात उतरला. इथर ट्रेड एशियाच्या नावाखाली बिट क्वाईनमध्ये रक्कम गुंतवण्यासाठी तो ठिकठिकाणी मोठमोठे सेमिनार घेऊन अनेकांना गुंतवणूक करण्यास बाध्य करू लागला. त्याची एकूणच शैली बघून अनेकांनी पवार आणि वासनिककडे आपली लाखोंची रोकड दिली. त्यांनी रकमेच्या परताव्याचे जे दावे केले होते, ते फसवे निघाल्याने पवारविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्याला पोलिसांनी कारागृहात डांबले. पाच ते सहा वर्षे कारागृहात काढल्यानंतर पवार मार्च २०२१ मधून कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर वासनिकने त्याच्यामागे पवारने दडवून ठेवलेल्या मोबाईलसाठी तगादा लावला. या मोबाईलमध्ये कोट्यवधीच्या व्यवहाराच्या नोंदी होत्या. पवारने ही रक्कम दडवून ठेवल्याचा आरोप करीत वासनिक ती रक्कम मागू लागला. त्यावरून त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. या पार्श्वभूमीवर, वासनिकने पवारची हत्या करण्याचा कट रचला.
---