लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : पर्यावरणाचा समताेल कायम राहण्यासाठी गावाची शिवार हिरवीगार रहावी म्हणून वग (ता. कुही) ग्रामपंचायत प्रशासनाने माेकळ्या जागेवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत विविध जातीच्या दाेन हजार राेपट्यांची लागवड करीत त्यांचे याेग्य संगाेपनही केले. एवढेच नव्हे तर, जमिनीतील पाणीपातळी कायम ठेवण्याच्या उद्देशाने मालगुजारी तलावाचे खाेलीकरण व दुरुस्तीही केली.
ग्रामपंचायत प्रशासनाने वृक्ष लागवडीचे नियाेजन करीत गुलमोहर, कॅशिया, शिसम, चिंच, जांभूळ, आवळा, सीताफळ, शेवगा, कवठ, आंबा, पेरू, लिंबू, कडूनिंब यासह अन्य झाडांच्या राेपट्यांची लागवड करण्यासाठी गावातील पांदण रस्त्यांचा काठ व मालगुजारी तलावालगतच्या माेकळ्या जागेची निवड केली. या तलावाच्या परिसरात सीताफळाची ५००, जांभळाची २००, लिंबाची ५०, शेवग्याची ५० राेपट्यांसह कवठ, आंबा, कॅशिया, गुलमोहराच्या राेपट्यांचीही लागवड केली आहे. त्यामुळे या तलावाचा ओसाड परिसर हळूहळू हिरवागार हाेत असून, त्याच्या साैंदर्यात भर पडत आहे.
जागमाता ते बुद्ध विहार या रस्त्यालगत ४००, पृथ्वीराज मेश्राम व केशव भदाळे यांच्या शेताच्या पांदण रस्त्यालगत ६०० तर नीळकंठ मते व केशव तितरमारे यांच्या शेताच्या पांदण रस्त्यालगत २०० राेपट्यांची लागवड करण्यात आली असून, ही सर्व राेपटी जिवंत आहेत. या राेपट्यांच्या संगाेपन व रक्षणासाठी सरपंच सुनीता निबंर्ते, उपसरपंच जितेंद्र मांढरे, ग्रामसेवक राकेश लाखडे, ग्रामविकास सेवक ज्ञानेश्वर उके प्रयत्नरत आहेत.
...
१४ मजुरांची नियुक्ती
या सर्व झाडांच्या देखभालीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने १४ मजुरांची नियुक्ती केली असून, त्यांना प्रतिदिवस २४८ रुपये मजुरी दिली जाते. ही मजुरी त्यांच्या बँक खात्यात जमा केली जात असल्याची माहिती मजुरांनी दिली. वग शिवारातील नाल्याची साफसफाई, दुरुस्ती व रुंदीकरण करण्यात आले असून, मालगुजारी तलावाचेही खाेलीकरण व दुरुस्ती करण्यात आली. ही कामे ६० मजुरांकरवी करण्यात आली. वग येथील एका मजुराला वर्षभरात किमान १०० दिवस काम उपलब्ध करून दिले जात असून, त्यांची हजेरी ऑनलाईन नाेंदविली जाते.