नागपूर: 'लोकमतला अगोदरपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, आचार्य विनोबा भावे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झाला. लोकमतने पहिल्या दिवशीपासूनच धर्मनिरपेक्षता जोपासली. सर्वधर्मसमभाव ही भूमिका राहिली' असे प्रतिपादन लोकमत ’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केले. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेच्या आयोजनात प्रास्ताविकात त्यांनी या आयोजनामागील लोकमतची भूमिका विशद केली.
ते पुढे म्हणाले, क्षमा व अहिंसा आमच्या ह्रद्यात आहे. मानवतेहून मोठा धर्मच नाही व हे संस्कार आम्ही जपले. सर्व धर्म, पंथ यांचा आदर केला. भारताची भूमिका सर्वात महत्वाची आहे. अनेक युगांपासून लोक एकत्रित नांदत असून वसुधैव कुटुंबकम हा देशाचा संस्कार आहे. परंतु धर्माच्या नावावर मनुष्यांची हत्या होत आहे. धर्म व मानवतेत नेमके काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतो. धर्माच्या नावावर सध्या जी परिस्थिती निर्माण झाली त्या पार्श्वभूमीवर सामाजिक सौहार्दावर चर्चा करावी ही कल्पना समोर आली. या परिषदेतून जे विचार निघणार आहे ते निश्चित मौलिक राहणार आहेत व जगाला दिशा दाखविणारे ठरतील, असा विश्वास लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केला.