नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाने नाट्यगृह, चित्रपटगृृह उघडण्यासोबतच सांस्कृतिक क्षेत्राला मोकळीक देणारा शासन निर्णय सोमवारी रात्री जारी करताच सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित सर्व आस्थापना जोराशोराने तयारीला लागल्या आहेत. तब्बल दीड वर्षानंतर सांस्कृतिक क्षेत्राला पुनरुज्जीवन मिळणार, याचा आनंद दिसून येत आहे.
कोरोना संक्रमणाचे आक्रमण होताच २० मार्च २०२० पासून महाराष्ट्रात लॉकडाऊनअंतर्गत सांस्कृतिक क्षेत्र बंद पडले होते. पहिली लाट ओसरल्यानंतर ५ नोव्हेंबर २०२० पासून सांस्कृतिक क्षेत्राला मोकळीक मिळाली होती. मात्र, संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागले आणि सावरत असलेल्या सांस्कृतिक क्षेत्रावर मरगळ आली. या काळात चित्रपटगृहांची तर पार वाताहत झाली. अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद पडण्याच्या मार्गावर आले. दुसरी लाट ओसरल्यानंतर सर्वांत शेवटी सांस्कृतिक क्षेत्र २२ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्याच्या परवानगीचा शासन निर्णय ११ ऑक्टोबरला रात्री आला. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने निर्देशिका जारी केल्या आहेत.
चित्रपट-नाट्यगृहांसाठी असे असतील नियम
- ५० टक्के आसनक्षमता. ५० टक्के आसने लॉक करणे.
- कार्यक्रम व चित्रपटाच्या एका शो पूर्वी आणि नंतर सॅनिटायझेशन करणे.
- वेळोवेळी फवारणी करणे.
- चित्रपटगृहांत मास्कशिवाय प्रवेश नाही. नाट्यगृहात आयोजकांवर व सभागृह संचालकांवर मास्क पुरविण्याची जबाबदारी असेल.
- वय वर्षे १८ च्या खालील मुले- तरुणांना प्रवेश नाही.
- दोन्ही मात्रांचे लसीकरण झालेले असणे बंधनकारक व दुसरी मात्र घेतल्यानंतर १४ दिवस झालेले असणे बंधनकारक.
हा आनंदाचा क्षण
तब्बल दीड वर्षापासून नाट्यगृह बंद आहेत. त्यांचा तोटा अमाप झाला आहे. शासन निर्णय तेवढेही कठीण नाहीत. तयारी पूर्ण झाली आहे. आता केवळ आयोजक आणि प्रेक्षकांच्या स्वागताची प्रतीक्षा आहे.
-अरविंद गडीकर, सचिव- सायंटिफिक सोसायटी हॉल
आता पुन्हा बंदी येणार नाही ही अपेक्षा
चित्रपटगृहांना परवानगी मिळाली, हा उत्साहाचा क्षण आहे. शासन निर्णय पाळणे कठीण नाही. गेल्या दीड वर्षात नागरिकांना व चित्रपटगृहांनाही या नियमांची सवय झाली आहे. आता कोरोना संक्रमण परत येऊ नये आणि पुन्हा बंदी लागू नये, हीच अपेक्षा.
-प्रतीक मुणोत, संचालक, पंचशील सिनेमा
.......................