लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीला शिथिल करत केंद्र सरकारने अनलॉक-४ची घोषणा २ सप्टेंबरपासून केली होती. त्याअनुषंगाने ७ सप्टेंबर व २१ सप्टेंबर असे शिथिलतेचे स्लॅब पाडले होते. २१ सप्टेंबरपासून सांस्कृतिक क्षेत्राला कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी काही सवलती देण्यात आल्या होत्या. मात्र, नागपुरात तशी सवलत अद्याप मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.देशात महाराष्ट्रामध्ये कोरोना संक्रमितांची संख्या जास्त आहे आणि दररोज संक्रमितांचा आकडा डोळे वटारणारा ठरत आहे. त्यामुळे, केंद्र शासनाच्या नागरिकांना द्यावयाच्या शिथिलतेच्या निर्णयात महाराष्ट्र सरकार पूर्ण सहमत नसल्याचे दिसते. नागपुरातही दररोज दिड ते दोन हजार संक्रमित आढळत आहेत. त्यामुळे, नागपुरातही स्थिती किचकट झाली आहे. अशा स्थितीत गेल्या सहा महिन्यांपासून स्तब्ध झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना मिळेल आणि रोजगाराची साधने पुन्हा सुरू होण्याची कलावंतांची आशा धुळीस मिळाली आहे. केंद्र सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ओपन एअर थिएटर केवळ शंभर प्रेक्षकांसह सुरू करण्याची परवानगी अनलॉक -४च्या घोषणेत केली आहे. त्याचा आनंद महाराष्ट्रातील कलावंतांनाही झाला होता. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाने कलावंतांचा हा आनंद आभासी ठरला आहे. त्यातच ओपन थिएटर्सही नसल्यानेही समस्या होती. म्हणून सांस्कृतिक क्षेत्राला आणखी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.केंद्र सरकारने २१ सप्टेंबरपासून सांस्कृतिक क्षेत्राला मोकळीक दिली असली तरी महाराष्ट्र सरकारची बंधने कायम आहेत. नागपुरात तशीही कोरोना संक्रमणाबाबतची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे, राज्य शासनाचा निर्णय होईस्तोवर सध्या तरी नागपुरात सांस्कृतिक कार्यक्रमांना मोकळीक नाही.
सांस्कृतिक क्षेत्राला अद्याप सूट नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 8:37 PM
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीला शिथिल करत केंद्र सरकारने अनलॉक-४ची घोषणा २ सप्टेंबरपासून केली होती. त्याअनुषंगाने ७ सप्टेंबर व २१ सप्टेंबर असे शिथिलतेचे स्लॅब पाडले होते. २१ सप्टेंबरपासून सांस्कृतिक क्षेत्राला कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी काही सवलती देण्यात आल्या होत्या. मात्र, नागपुरात तशी सवलत अद्याप मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
ठळक मुद्देस्पष्ट निर्देशच नाहीत : ओपन थिएटर्सही अभाव