नागपूर : नागपूर येथील आमदार निवासात कपबशा शौचालयात धुतल्या जात असल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त केला जात असून, याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी एका व्हिडीओद्वारे ही बाब समोर आणली होती. अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित करताना संतप्त भावना व्यक्त केली. आमदार निवासाच्या प्रवेशाद्वारावर चांगला मेकअप असला तरी आत अत्यंत वाईट अवस्था आहे. हे कंत्राटदार कुणाचे बगलबच्चे आहेत का?, असा सवाल केला.
कागदी कप वापरण्याचे उपसभापतींचे निर्देश
- विधीमंडळ परिसरात काचेच्या कपांऐवजी कागदी कप वापरले जावे, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. आमदार निवासातील अस्वच्छतेबाबत अमोल मिटकरी यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी निर्देश दिले.
- मिटकरी यांनी आमदार निवास परिसरात कंत्राटदाराकडून अन्नाची भांडी स्वच्छतागृहाच्या पाण्याने धुतल्याचा मुद्दा मांडला. तसेच या संदर्भातील व्हिडीओचा पेनड्राइव्ह त्यांनी सभागृहात सादर केला. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.