लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील जलालखेडा, भारसिंगी, भिष्णूर, थडीपवनी, अंबाडा, सायवाडा, मोवाड, नरखेड परिसरांत अवैध सट्टापट्टी, तर काही भागांत अवैध दारूविक्री सुरू आहे. काेराेना संक्रमणकाळात अवैध धंदे धाेकादायक ठरू शकतात. त्यामुळे या अवैध धंद्यांना कायमचा आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी जलालखेड्याचे ठाणेदार मंगेश काळे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
जलालखेडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या काही गावांमधील नागरिकांनी सट्टापट्टी, अवैध दारूविक्री व इतर अवैध धंदे बंद करण्याबाबत ठाणेदारांकडे तक्रारी केल्या हाेत्या. त्या तक्रारींची दखल घेत पाेलिसांनी मध्यंतरी छापे टाकून सट्टापट्टी स्वीकारणाऱ्या चाैघांना अटक केली हाेती. त्यानंतर काही दिवसांनी ही सट्टापट्टी पुन्हा सुरू झाली. सध्या काेराेना संक्रमणकाळ सुरू आहे. सट्टा लावणारी मंडळी स्वीकारणाऱ्याजवळ गर्दी करतात.
यातील बहुतांश व्यक्ती विनामास्क असतात. त्यांचा हा निष्काळजीपणा व पाेलिसांचे त्यांच्याकडे हाेत असलेले दुर्लक्ष काेराेनाच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळे जलालखेडा, भारसिंगी, भिष्णूर, थडीपवनी, अंबाडा, सायवाडा, मोवाड, नरखेड या भागांतील सट्टापट्टी कायम बंद करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात चंद्रशेखर हाडके, साजिद पठाण, वसंता पाटील, हर्षल डोहरे, अक्षय डोहरे, सागर वानखडे, अमोल तायडे, भावेश घोरसे, विक्की सौदागर यांचा समावेश हाेता.