लोकमत न्यूज नेटवर्कनागपुर : शहरात जाहीर केलेल्या शनिवार व रविवारच्या ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, कार्यालये, आस्थापना बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. ‘कर्फ्यू’ संपला आता पुढे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पण एवढ्याने ‘कोरोना’चे संकट संपणारे नाही. दोन दिवसात नागरिकांनी जी शिस्त आणि नियमाचे पालन केले असेच वर्तन यापुढेही कायम ठेवावे लागेल. तरच ‘लॉकडाऊन’ पुन्हा लागणार नाही. अन्यथा मनपा प्रशासनाला कठोर ‘लॉकडाऊन’ संदर्भात पुनर्विचार करावा लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.सोमवार ते गुरुवार लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून नागरिक शिस्त व नियमाचे काटेकोर पालन करतात की नाही, याचे अवलोकन करतील. नागरिकांना यासाठी आवाहन करतील. चार दिवसाच्या अवलोकनानंतर शुक्रवारी पुन्हा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक होईल. यात ‘लॉकडाउन’ लावायचा की नाही यावर निर्णय घेतला जाईल.
दोन दिवसाच्या ‘कर्फ्यू’दरम्यान नागरिकांनी शिस्त आणि नियमाचे पालन केले. सोमवारनंतर पुढेही असेच सर्वांचे वर्तन राहिले तर पुन्हा ‘लॉकडाऊन’ लागणार नाही. अन्यथा ‘कर्फ्यू’सह लॉकडाऊन लागेल. असे संकेत महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.‘कर्फ्यू’ टाळायचा तर महिनाभर शिस्त पाळा : महापौरमनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी याच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन दिवसाच्या कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दरम्यान नागरिकांनी शिस्त व संयमाचे काटेकोर पालन केले. लॉकडाऊन लावायचा नसेल तर नागरिकांनी महिनाभरात असेच शिस्त व नियमांचे पालन करावे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा. ‘कोरोना’ हद्दपार करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू या,असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.अशीच स्वयंशिस्त यापुढेही पाळा : झलकेदोन दिवसाच्या ‘कर्फ्यू’दरम्यान शहरातील नागरिकांनी शिस्त व संयम राखला, नियमांचे काटेकोर पालन केले. अशीच स्वयंशिस्त यापुढेही दाखवा, आपण सर्व मिळून कोरोनाला हद्दपार करू या, असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी केले आहे.