लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण शिबिराचा समारोप रविवारी सायंकाळी होणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा: पंतप्रधान बनल्यानंतर सरसंघचालक पहिल्यांदाच सार्वजनिकपणे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे ते आपल्या भाषणातून स्वयंसेवकांना काय संदेश देतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ते रविवारी सायंकाळी ६.३० वाजता मार्गदर्शन करणार असून सोशल मीडियावर याचे थेट प्रसारण सुद्धा होणार आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण शिबिराला अतिशय महत्त्व आहे. स्वयंसेवकांना यादरम्यान शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण घेणाऱ्या स्वयंसेवकांना प्रचारकाची जबाबदारी मिळते. हे शिबिर दरवर्षी नागपुरातच होते. संघावर प्रतिबंध असताना या शिबिरचे आयोजन झाले नव्हते. यावर्षी २३ मे रोजी हे शिबिर सुरू झाले. या २५ दिवसीय शिबिरात देशभरातील ८२८ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. शिबिरात सहभागी या स्वयंसेवकांनी अनिरुद्ध देशपांडे यांच्या मार्गदर्शनात या २५ दिवसात संघाला समजून घेतले. यांना प्रशिक्षण देण्यात कार्यवाह भारतभूषण, पालक अधिकारी जगदीश प्रसाद, मुख्य शिक्षक गंगाराम पांडेय, सह मुख्य प्रशिक्षक के. प्रशांत, बौद्धिक प्रमुख कृष्णा जोशी, सह बौद्धिक प्रमुख सुरेश कपिल, सेवा प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह भय्याजी जोशी आणि सहसरककार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी दरम्यान स्वयंसेवकांचे मार्गदर्शन केले.गेल्या वर्षी प्रणब मुखर्जी होते पाहुणे२०१८ मध्ये संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या उपस्थितीमुळे खूप चर्चेत राहिला. संघाच्या सूत्रानुसार यावर्षी संघाने टाटा समूहाचे रतन टाटा यांना निमंत्रित केले होते. परंतु ते येत नसल्याने संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाच अतिथी बनवण्यात आले आहे. १९२५ मध्ये स्थापित संघाचे पहिले प्रशिक्षण शिबिर १९२९ मध्ये नागपुरातच झाले होते. तेव्हापासून हे दरवर्षी नागपुरात होत आहे. पूर्वी हे शिबिर ४० दिवस चालत असे. परंतु वेळेनुसार आता २५ दिवसाचे करण्यात आले आहे.