लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सध्या देशभरात व्हायरल होणारा एक फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावत आहेत.. तर काहींना त्याने अंतर्मुख केले आहे. टॉयलेटचा दरवाजा अर्धवट उघडून बसलेली एक स्त्री या फोटोत आहे. या दरवाजाबाहेर असलेले तिचे लहानसे मूल घाबरून जाऊ नये यासाठी तिला तसे करावे लागले आहे. तिच्या व अनेकजणींच्या आयुष्यातले हे वास्तव याआधी सामाजिक स्तरावर चर्चेसाठी कधीही आले नव्हते. या फोटोमुळे ते तसे घडले आहे. सोशल मिडियावर यासंदर्भात अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.या फोटोत असलेली स्त्री आहे गीता यथार्थ. त्या भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात कार्यरत असून त्या एकल पालक आहेत.आईपण निभावताना तिला ज्या प्रसंग, संकटांना सामोरे जावे लागते त्याची ही एक झलक आहे. या पोस्टमध्ये गीता लिहितात, 'मी टॉयलेटचं दार सर्वात शेवटी कधी बंद केलं होता, मला आठवत नाही. आता तर परिस्थिती अशी आहे, की आॅफिसमध्येही टॉयलेटचं दार बंद करणं लक्षात राहत नाही अनेकदा. आणि आता मुलाला फोटो काढणंही जमायला लागलं आहे.' या पोस्टला त्यांनी लाईफ आॅफ अ सिंगल मदर असं संबोधलं आहे. पुढं त्यांनी लिहिलं आहे, 'मदरहूड अर्थात आईपण निभावणं हा सोपा जॉब नाही. तो स्वर्गीयही नाही. त्याचं उदात्तीकरण थांबवा.'
त्यांची ही पोस्ट अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली आहे. बहुतेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे व पाठिंबा दिला आहे. मात्र काहींना हे मान्य नाही. असे सार्वजनिक ठिकाणी व्यक्तीगत फोटो टाकणे त्यांनी निषेधार्ह ठरवले आहे.