लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारीमुळे तब्बल साडेसात महिने सांस्कृतिक कार्यक्रमाला लगाम लागला होता. टप्प्या टप्प्यात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असतानाही रंगमंच बंदच ठेवण्यात आला होता. त्यामुळे साडेसात महिने कुठलेही नाटक, गायनाचे कार्यक्रम, नृत्याचे सादरीकरण झाले नाही. मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रंगकर्मींना भेट देत सांस्कृतिक कार्यक्रमाना मोकळीक दिली. त्यानंतर लागलीच नागपुरातील अंतर्मन कला अकादमीतर्फे रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहाचा पडदा उघडला आणि नटेश्वराची प्रार्थना करून पूजन करण्यात आले.
यावेळी २०२०ची सुरुवात काटेदार असली तरी अंत मात्र सुखद करण्याचा निर्धार करण्यात आला आणि नव्या कार्यक्रमांच्या तयारीसाठी कंबर कसण्यात आली. ज्येष्ठ अभिनेत्री मीना देशपांडे व मनपा स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या हस्ते नटेश्वराचे व रंगमंचाचे पूजन करण्यात आले. यावेळी अकादमीचे सचिव दिलीप देवरणकर, मकरंद भालेराव, अभय देशमुख, लता कनाटे, अनिल पालकर, राजेश पाणूरकर, अतुल शेबे, कविता भुरे, स्वप्निल बनसोड, डॉ. प्रशांत प्रांजळे, डॉ. सुनील पुडके, प्रफुल्ल ठाकरे उपस्थित होते.