लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चिपयुक्त एटीएम कार्ड न मिळाल्यामुळे बँक ऑफ इंडियाचे अनेक कार्डधारक त्रस्त आहेत. यासंदर्भात चौकशी केली असता अनेकांना एटीएम कार्ड चुकीच्या पत्त्यावर पाठविण्यात आल्याची खरी बाब पुढे आली आहे. असे का होत आहे, यावर बँकेचे अधिकारी अनभिज्ञ आहेत. एवढेच नव्हे तर नोव्हेंबरमध्ये तयार झालेले कार्ड जानेवारीमध्ये का मिळाले, यावर अनेक जण हैराण आहेत.एवढा उशीर का?बँकेने जुने कार्ड ३१ डिसेंबरला बंद केले. ३१ डिसेंबरपूर्वी शाखेत येऊन चिप असलेले नवीन कार्ड प्राप्त करण्याचे बँकेतर्फे ग्राहकांना सांगण्यात आले. जेव्हा ग्राहक बँकेत पोहोचले तेव्हा त्यांच्यासमोर एक रजिस्टर ठेवण्यात आले. कार्ड आले वा नाही, याकरिता रजिस्टरमध्ये नाव शोधण्यास सांगण्यात आले. ज्यांचे नाव रजिस्टरमध्ये होते त्यांना कार्ड मिळाले, पण अनेकांचे नाव रजिस्टरमध्ये नव्हतेच. तेव्हा त्यांना ३१ डिसेंबरपूर्वी कार्ड येईल, असे सांगण्यात आले. ग्राहक बँकेत अनेकदा आले, पण त्यांना कार्ड मिळाले नाही. यादरम्यान तुमचे कार्ड स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठविण्यात आल्याचा संदेश ग्राहकांना डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात बँक ऑफ इंडियाकडून मिळाला. दोन ते तीन दिवसांत कार्ड येईल, अशी ग्राहकांना अपेक्षा होती. पण ती अखेर फोल ठरली.बँक ऑफ इंडियाच्या संदेशात एअर वे बिल (एडब्ल्यूबी) क्रमांक लिहिला होता. त्यामुळे लोकांनी स्पीड पोस्ट ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. पण नेटवर अनेकदा हा एअर वे बिल क्रमांक वैध नसल्याचा संदेश आला. एक आठवड्यानंतर एअर वे बिल स्पीड पोस्ट ट्रॅकिंगच्या रडारवर आला. अनेक ग्राहक ट्रॅक करीत होते. तीन दिवसानंतर ग्राहकांना असे दिसून आले की, कार्ड पोस्ट ऑफिसपर्यंत पोहोचले, पण चुकीच्या पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचल्याबद्दल त्यांना आश्चर्य वाटले. ग्राहकांनी त्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क आणि चौकशी केली असता, त्यांना ग्राहकांचे नाव योग्य आहे, पण पाच वर्षे जुन्या पत्त्यावर कार्ड पाठविल्याचे समजले. खरी बाब अशी की, अनेक ग्राहकांनी पत्ता बदलल्याचे बँकेला कळविले आहे.नवीन पत्त्याची नोंद पासबुकमध्ये पाच वर्षांपासून आहे. यासंदर्भात बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी असे का होत आहे, यावर आश्चर्य व्यक्त केले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अशाप्रकारच्या अनेक तक्रारी आल्या असून, चुकीच्या पत्त्यामुळे अनेक ग्राहकांना कार्ड मिळालेले नाही. बँकेने कार्ड वितरणाचे काम वेंडर्सला दिल्याचे चौकशीदरम्यान पुढे आले. त्या वेंडर्सकडे ग्राहकांचे जुने पत्ते आहेत वा ही बँकेची चुकी आहे की ग्राहकांचे पत्ते वेंडर्सला अपडेट करून दिलेच नाहीत. अशीही शंका आहे की, वेंडर्सने पत्ते अपडेट केलेच नाहीत. या सर्व घटनाक्रमात ग्राहक मात्र खरोखरच त्रस्त आहेत.