- जिल्ह्यातील ३६० उमेदवारांना दिले जाईल ‘ऑन जॉब ट्रेनिंग’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील दुविधा बघता, आगामी काळात कोरोना संक्रमणाच्या स्थितीचा आढावा घेत आरोग्य सेवेची व्यवस्था लावण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ३.०च्या मध्यवर्ती कार्यघटकातील विशेष प्रकल्प श्रेणीअंतर्गत कोरोनायोद्ध्यांसाठी ‘कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स प्रोग्रॅम’ राबविण्यात येत आहे.
हा अभ्यासक्रम ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ स्वरूपात असणार आहे. या अभ्यासक्रमाद्वारे कुशल कोरोनायोद्ध्यांची कुमक भरून काढणे, उपलब्ध आरोग्यसेवा यंत्रणेला मर्यादित काळात मजबूत करणे हा हेतू आहे. यासोबतच कोरोना संक्रमणाच्या दोन्ही लाटेत निर्माण झालेल्या अभूतपूर्व आव्हानांचा विचार करता, द्रवरूप ऑक्सिजन हाताळण्याचे व त्याची वाहतूक करण्याचे प्रशिक्षण असलेल्या चालकांची तूट भरून काढण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. हे प्रशिक्षण सर्व प्रवर्गातील नागपूर जिल्ह्यातील ३६० युवक/युवतींना देण्याचे निश्चित झाले आहे. या कार्यक्रमांतर्गत इस्पितळांमार्फत ‘ऑन जाॅब ट्रेनिंग’ पद्धतीने बेरोजगार उमेदवारांना विद्यमान क्रॅश कोर्स प्रोग्रॅमच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील विविध सहा प्रकारच्या कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात कोविड फ्रंटलाइन वर्कर - बेसिक केअर सपोर्ट, होम केअर सपोर्ट, ॲडव्हान्स्ड केअर सपोर्ट, सॅम्पल कलेक्शन सपोर्ट, इमर्जन्सी केअर सपोर्ट व मेडिकल इक्विपमेंट सपोर्टचा समावेश आहे. यासाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्रमांक २, दुसरा माळा, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे संपर्क साधू शकतील, अशी माहिती केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रभाकर हरडे यांनी दिली.
.............