"कट, कमिशन, करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री"; मुख्यमंत्री शिंदे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 09:00 AM2024-07-08T09:00:46+5:302024-07-08T09:01:09+5:30
आता रडणं बंद करा. शिवसेनेचा मूळ मतदार हा धनुष्यबाणासोबत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
नागपूर : कट, कमिशन व करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री आहे. २०२४ मध्ये जंग जंग पछाडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करू शकले नाहीत. घोटाळ्याचा डाग लावू शकले नाहीत. त्यामुळे काँग्रेसला घोटाळ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसच्या काळात अनेक घोटाळे झाले. घोटाळ्यांची मालिका इतकी मोठी होती की, २०१४ व २०१९ मध्ये जनतेने काँग्रेसला घरी बसवले.
लोकसभेमध्ये लोकांनी दाखवून दिले की, उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आम्हाला जास्त मते मिळाली. उद्धवसेनेचा स्ट्राइक रेट ४२ टक्के होता तर आमचा स्ट्राइक रेट ४७ टक्के आहे. आता रडणं बंद करा. शिवसेनेचा मूळ मतदार हा धनुष्यबाणासोबत आहे, याची प्रचिती विधानसभेत येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.