नागपूर : कारागृहातून पळून गेलेल्या कैद्यांशी संबंधित एकाला काही दिवसापूर्वी २० लाख रुपयांची खेप (खंडणी) पोहचली होती, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या खंडणीचा आणि पलायन प्रकरणाचा काही संबंध आहे काय, त्याबाबत गुन्हेगारी क्षेत्रात शहानिशा केली जात आहे. सोबतच कारागृहातून पलायनाच्या कटामागे आणखी कोणता कट आहे काय, त्याचीही चौकशी गुन्हेगारी वर्तुळात केली जात आहे. पळून गेलेल्या गुन्हेगारांपैकी सत्येंद्र गुप्ता आणि बिशनसिंग हे दोघे कुख्यात राजा गौसचे खास साथीदार असून त्यांनी मिळून अनेक गुन्हे केले आहेत. मात्र, राजा गौसला कारागृहात ठेवून त्यांनी स्वत: पळून जावे, हा प्रकार अनेक गुन्हेगारांना खटकत आहे. त्याचमुळे या पलायनामागे कोणता तरी कट असावा, असा अंदाज गुन्हेगारी वर्तुळात लावला जात आहे. एवढेच काय, राजा गौसच्या नातेवाईकावर १४ मार्चला झालेल्या हल्ल्याचे धागेही या पलायनाशी जोडले जात आहे. गुप्ता, बिशनसिंग आणि शिबू हे तिघेही क्रूर गुन्हेगार आहे. क्षुल्लक कारणावरून त्यांनी खुनासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यामुळे गौसच्या नातेवाईकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला चुकविण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली काय, याची माहिती गुन्हेगारी जगतातून काढली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपुर्वी या टोळीशी संबंधित एकाला २० लाखाची खंडणी मिळाली. या खंडणीचा वापर कारागृहातील सुरक्षा सांभाळणारांचे तोंड बंद करण्यासाठी आरोपींनी केला असावा. त्याचमुळे रात्रपाळीवर सुरक्षा कर्मचारी, अधिकारी उपस्थित असताना आणि वॉचटॉवरवरही निगराणी करणारे असताना पाच कैदी पळून जाताना कुणालाही दिसले नाही.
कटामागे कट
By admin | Published: April 01, 2015 2:23 AM