नागपूर : त्या दिवशी जागतिक निसर्ग संवर्धन दिवस जगभर साजरा हाेत हाेता. झाडे, निसर्ग वाचविण्यासाठी साऱ्यांचे प्रयत्न चालले हाेते आणि त्याचवेळी काही असामाजिक तत्व झाडे ताेडण्यासाठी सरसावले हाेते. पहाटेच्या सुमारास ऑटाेने ते आले आणि कुऱ्हाडीने सपासप वार करीत चार झाडे कापून ते निघूनही गेले. केवळ हाेर्डिंगवर लावलेल्या जाहिराती दिसाव्या म्हणून त्या झाडांची कत्तल झाली.
लाेकमतने सातत्याने अशा घटना प्रकाशात आणल्या आहेत पण अशा प्रकाराचा अंत हाेताना दिसत नाही. बुधवारीही असाच प्रकार घडला. अमरावती राेडवरील रिमाेट सेन्सिंग सेंटरजवळ असलेली तीन-चार झाडे ताेडण्यात आली. येथे उपस्थित सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ७ वाजताच्या सुमारास ऑटाेने काही माणसे आली आणि त्यांनी काही विचार न करता रस्त्यावरची ही झाडे ताेडूनही टाकली. सुरक्षा रक्षकाने विचारले असता, ‘मनपाकडून परवानगी’ घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
उल्लेखनीय म्हणजे महापालिकेने २०१८ मध्ये वृक्षाराेपण माेहिमेदरम्यान या झाडांची लागवड केली हाेती. या दाेन तीन वर्षात संगाेपन केल्यानंतर २० फुटापर्यंत वाढली आहेत. पर्यावरण कार्यकर्त्यांच्या मते हाेर्डिंगवर लावलेली जाहिरात लाेकांना स्पष्ट दिसावी म्हणून बेमुर्वतपणे ही झाडे ताेडण्यात आली. यावर महापालिका काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
मनपा म्हणते, एफआयआर करू
दरम्यान पर्यावरण कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या उद्यान विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जाहिरात एजन्सीविराेधात एफआयआर दाखल करणार असल्याचे व कंपनीला नाेटीस बजावली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. रस्त्यावर लागलेली जाहिरात कायदेशीर परवानगी घेऊन लावली आहे की नाही, याचीही चाैकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अभिजित बांगर यांनी केली हाेती कारवाई
ग्रीन व्हिजीलचे संस्थापक काैस्तुभ चटर्जी यांनी सांगितले, धरमपेठच्या बाेले पेट्राेल पंपाजवळ २०१९ मध्ये अशाचप्रकारे जाहिरात दिसावी म्हणून काही झाडे कापण्यात आली हाेती. तेव्हा तत्कालीन मनपाआयुक्त अभिजित बांगर यांनी सहायक आयुक्त विजय हुमने यांच्या नेतृत्वात चाैकशी समिती तयार केली व त्यांच्या रिपाेर्टवरून संबंधित जाहिरातच काढून फेकली व सहा महिने एकही जाहिरात लागू दिली नाही. वर्तमान आयुक्त अशाप्रकारे कारवाई करतील का, असा सवाल करीत अशी समिती कायमस्वरूपी स्थापन व्हावी, अशी अपेक्षा चटर्जी यांनी व्यक्त केली.
२०० च्यावर झाडांची कत्तल
विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात हाेर्डिंगवरच्या जाहिराती दिसाव्या म्हणून जाहिरातबाजांनी शहरातील विविध मार्गावरील २०० च्यावर झाडांची कत्तल केली आहे. मानेवाडा रिंग राेडवर अशाप्रकारे खुंटलेल्या अवस्थेत असंख्य झाडे दिसतात. अनेकदा ॲसिड टाकूनही झाडे जाळली जातात. उद्यान विभाग याकडे गंभीरपणे कारवाई करीत नसल्यानेच हा प्रकार सर्रासपणे हाेत असल्याचा आराेप पर्यावरणवाद्यांनी केला.