लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झाडे कापूनच कागद निर्मिती केली जाते आणि त्यामुळे वनसंपदेचा ऱ्हास होतो, हा गैरसमज लोकांमध्ये अनेक वर्षांपासून पसरविला गेला आहे. वास्तविक उपयोगात येणारा ७० टक्के कागद हा पुनर्प्रक्रियेतून निर्माण केला जातो. त्यामुळे लोकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्यासाठी आणि जनजागृतीसाठी नागपूर पेपर ट्रेडर्स असोसिएशनतर्फे १ आॅगस्ट हा दिन राष्ट्रीय पेपर दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष असीम बोरडिया यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.१ आॅगस्ट १९४० रोजी पुणे येथे देशातील पहिली पेपर मिल के.बी. जोशी यांनी सुरू केली होती व पं. जवाहरलाल नेहरू यांनी त्याचे उद्घाटन केले होते. याचे स्मरण म्हणून हा दिवस असोसिएशनतर्फे निवडण्यात आल्याचे बोरडिया यांनी सांगितले. याअंतर्गत १ आॅगस्टला गणेशपेठ पोलीस स्टेशनपासून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली शहरातील विविध मार्गाने फिरून त्याच ठिकाणी समारोप होईल. यानंतर पुढेही जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असून देशभरात याबाबत प्रसार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले, भारतात उपयोगात येणारा ३५ टक्के कागद वेस्ट पेपरमधूनच निर्माण केला जातो. याशिवाय ४२ टक्के कागद कृषी वेस्टमधून तयार केला जातो. केवळ ३२ टक्के कागद बांबू आणि इतर लाकडापासून तयार केला जातो व यातील बहुतेक पल्प इंडस्टीमधून आयात केला जातो. शिवाय देशातील कागद उद्योजक पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जबाबदारी म्हणून वृक्षारोपणासाठी पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.देशात ३२० च्या आसपास पेपर मिल असून त्यातील केवळ ३० ते ३२ मिल या झाडांच्या लगद्यावर अवलंबून आहेत. शिवाय कागद पूर्णपणे नष्ट होणारी गोष्ट आहे, त्यामुळे ती पर्यावरणासाठी हानीकारक अजिबात नाही. कागद आणि प्लास्टिक यांची तुलना केली जाऊ शकत नाही, असेही बोरडिया यांनी आवर्जून नमूद केले. त्यामुळे कागदामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, हा निव्वळ भ्रम असून याबाबत उद्योजकांसह शाळा-महाविद्यालये व नागरिकांमध्ये जागृती करण्याचे अभियान राबविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला असोसिएशनचे सचिव पीयूष फत्तेपुरिया, माजी अध्यक्ष महेश खंडेलवाल, विजय खंडेलवाल, उपाध्यक्ष दिलीप जैन, सुशील केयाल आदी उपस्थित होते.