नागपूर : देशातील आघाडीची स्फोटके उत्पादक कंपनी असलेल्या सोलर ग्रुपवर ‘सायबर’ हल्ला झाल्याची बाब समोर आली आहे. अज्ञात हॅकर्सने हा हल्ला केला असून संवेदनशील डेटा चोरला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. सोलर ग्रुपकडून भारतीय सैन्यासाठीदेखील ‘मल्टीमोड ग्रेनेड्स’ बनविण्यात येतात. या पार्श्वभूमीवर ही घटना सुरक्षायंत्रणांनी गंभीरतेने घेतली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोलर ग्रुपवर मागील मागील आठवड्यात हा सायबर हल्ला झाला. हॅकर्सने त्यात कंपनीचा महत्त्वाचा डेटा चोरला. त्यात कंपनीच्या माहितीसह संरक्षण विषयक माहिती आणि ड्रॉईंग्जचा समावेश होता. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना सूचना दिली व तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल याचा तपास सुरू केला आहे. सोलर ग्रुपतर्फे औद्योगिक स्फोटकांसह भारतीय सैन्यासाठीही अनेक स्फोटके व निगडीत बाबींचे उत्पादन करण्यात येते. याशिवाय ‘मल्टीमोड ग्रेनेड्स’देखील बनविण्यात येतात. यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. यासंदर्भात आमच्याकडे तक्रार आली असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायबर सेलचे पथकाकडून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘सीबीआय’कडे तपास सोपविणार ?
‘ब्लॅक कॅट’ नावाच्या नावाच्या हॅकर्स ग्रुपने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या विषयावर संरक्षण दलाचे अधिकारी व नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांचीदेखील बैठक झाली आहे. या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ग्रुपचे संकेतस्थळ बंद
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा अतिशय संवेदनशील डेटा हॅकर्सच्या हाती लागला असण्याची शक्यता आहे. या प्रकारानंतर सोलर ग्रुपचे संकेतस्थळदेखील बंद झाले असून ‘साईट अंडर मेन्टेनन्स’ असा संदेश येत आहे. हॅकर्सकडे यातील डेटा परत मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात सोलर ग्रुपचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.