स्वतंत्र तपास : गुन्ह्यांच्या तपासाचे प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढती सायबर गुन्हेगारी लक्षात घेता आता प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र सायबर सेल निर्माण करण्यात आला आहे. सायबर गुन्ह्याचा तपास कसा करावा, याचे प्रशिक्षण संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेकडून देण्यात आले.
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. रोज नवनवीन प्रकारचे गुन्हे घडत असल्याने तक्रारदारांची संख्याही वाढली आहे. मात्र सायबर गुन्हेगारीचा छडा लावण्याचे प्रमाण फारच नगण्य आहे. नागपुरात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे आहे. मात्र कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने आणि तक्रारदारांची संख्या मोठी असल्याने पीडितांना दिलासा मिळण्याचे प्रमाण कमी आहे. ते लक्षात घेता पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र सायबर सेल उघडून पोलीस ठाण्याच्या स्तरावरच त्या भागातील गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश ठाणेदारांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्याचा तपास कसा करावा, त्यासंबंधीचे प्रशिक्षण पोलीस मुख्यालयात देण्यात आले. यात संबंधित व्यक्तीची तक्रार कशी नोंदवून घ्यायची आणि तपासाला सुरुवात कशी करायची यासंबंधीचे प्रशिक्षण सायबर पोलीस स्टेशनचे प्रमुख अशोक बागुल यांनी दिले.
---
सायबर गुन्हेगारीचे स्वरूप
ऑनलाइन बँकिंग चीटिंग, नोकरी, लॉटरीचे आमिष, सोशल मीडियावरून केली जाणारी फसवणूक, फिशिंग, विशिंग स्मिशिंग, ओएलएक्स आणि अशाच प्रकारच्या ऑनलाइन पोर्टलवर होणारी फसवणूक, हॅकिंग, सायबर दहशतवाद, सायबर स्टॉकिंग, चाईल्ड पॉर्नोग्राफी आदी सायबर गुन्हेगारीचे स्वरूप आहे.
--