लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोहमार्ग पोलीस दलात उपनिरीक्षक असलेल्या गिरीशचंद्र हरिहरनाथ तिवारी (वय ५०, रा. भोलेनगर, पारडी)यांच्या खात्यातून वर्षभरात सायबर गुन्हेगाराने दोनदा रक्कम लंपास केली. पहिल्यांदा सव्वा लाख रुपये लंपास करणाऱ्या आरोपीची तक्रार दाखल करून पोलीस चौकशी करीत होते. तिवारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ते बँक खाते बंद करून बँकेत दुसरे खाते उघडले. तेथे नवीन मोबाईल क्रमांक नोंदवला. तरीसुद्धा सायबर ठगाने दुसऱ्यांदा २ लाख, ९८ हजार रुपये लंपास केले. या प्रकाराने केवळ तिवारीच नव्हे तर पोलीस आणि बँक प्रशासनालाही जबर हादरा बसला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, उपनिरीक्षक तिवारी यांना २० फेब्रुवारी २०१८ ला दुपारी १ वाजता एक फोन आला. डीआरआयएम ऑफिसच्या एनटी विभागातून बोलतो, असे सांगून आरोपीने तिवारींचे आधारकार्ड, एटीएम कार्डची माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून आरोपीने १ लाख २४ हजार रुपये दुसऱ्या खात्यात वळते करून घेतले. ही बाब लक्षात येताच तिवारींनी आधी बँकेत आणि नंतर पोलिसांकडे धाव घेतली. बँकेने त्यांचे खाते ब्लॉक केले तर पोलिसांनी तक्रार नोंदवून चौकशी सुरू केली.नवीन खाते, नवीन मोबाईल तरीसुद्धा २.९८ लाख लंपासतिवारी यांच्या तक्रारीची पोलिसांकडून चौकशी सुरू असताना तिवारींनी रेल्वेस्थानकाजवळच्या एसबीआयमध्ये आपले नवीन खाते उघडले. त्या खात्याला नवीन मोबाईल नंबर संलग्न केला. आता धोका नाही, असे तिवारीसह बँक अधिकाऱ्यांनाही वाटत होते. मात्र, आरोपींनी ४ जानेवारीला पुन्हा तिवारींच्या खात्यातून २ लाख, ९८ हजार रुपये काढून घेतले. तिवारी यांनी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.