लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कधी बँकेतून तर कधी वेगवेगळ्या जॉब प्लेसमेंट कंपनीतून बोलतो, असे सांगून नागरिकांना फसविण्याचे प्र्रकार सुरूच आहे. ही फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीविरुद्ध पोलीस केवळ गुन्हे दाखल करून मोकळे होत आहे. त्यांच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश येत नसल्यामुळे सर्वसामान्यांची फसवणूक बिनबोभाट सुरू आहे. गणेशपेठमध्ये गुरुवारी अशाच प्रकारचा पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे.एअर इंडियामध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाचे सायबर टोळीतील भामट्याने ९४ हजार रुपये लंपास केले. शिवाजीनगर, हनुमान चौकात राहणारा राकेश अशोकराव डायरे (वय २६) हा तरुण मासे विक्रीचा व्यवसाय करतो. आॅक्टोबर २०१७ मध्ये त्याला ९७७३५५४१९४, ८७५०१८७२२१ आणि ९७७३५५४१५९ या मोबाईल नंबरवरून वेगवेगळे फोन आले. पलिकडून बोलणाऱ्या आरोपीने राकेशला एअर इंडियात विमानतळावर सुरक्षा रक्षकाची नोकरी लावून देतो, अशी थाप मारली. त्यासाठी प्रारंभी १० हजार रुपये आरोपीने राकेशकडून त्याच्या बँक खात्यात (क्रमांक २०२५२५०२०८३) जमा करून घेतले. त्यानंतर वेगवेगळे कारण सांगून आरोपी राकेशला त्याच्या बँक खात्यात रक्कम जमा करायला लावत होता. अशा प्रकारे २१ नोव्हेंबर २०१७ पर्यंत ८४ हजार रुपये जमा करायला भाग पाडल्यानंतर राकेशने त्याच्या मागे नोकरीचा तगादा लावला. तो टाळाटाळ करीत असल्याचे पाहून राकेशने आपली रक्कम परत मागितली. त्यावर आरोपीने पुन्हा एक क्लृप्ती लढवली. तुला तुझी संपूर्ण रक्कम परत हवी असेल तर पुन्हा नमूद क्रमांकाच्या बँक खात्यात १० हजार रुपये जमा कर, असे म्हटले. ही रक्कम जमा केल्यानंतर आरोपीने राकेशसोबत संपर्क तोडला. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर राकेशने सहा महिन्यांपूर्वी गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याला सायबर सेल मध्ये जाण्याचा सल्ला दिला. सायबर सेलकडून चौकशी झाल्यानंतर पुन्हा हे प्रकरण गणेशपेठ ठाण्यात पाठविण्यात आले. त्यानंतर गुरुवारी गणेशपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.दिल्ली, बिहार कनेक्शनराकेशला ज्या क्रमांकावरून हे फोन आले ते मोबाईल क्रमांक दिल्ली, नोएडा येथील इसमांच्या नावावर आहेत. सायबर टोळीतील गुन्हेगार दिल्ली, नोएडा, बिहार, झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. अस्खलित हिंदी, इंग्रजी बोलणारे हे गुन्हेगार स्वत:ला कधी बँकेचे अधिकारी तर कधी पोलीस अधिकारी असल्याचे सांगतात. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले, आऊटडेटेड झाले. नवीन कार्ड द्यायचे आहे, असे सांगून तो संपर्क करतात. बोलता बोलताच सहजपणे तुमच्या एटीएम कार्डचा नंबर, पीन कोड किंवा बँकेचा खातेक्रमांक आणि इतर माहिती वदवून घेतात. पुढच्या काही क्षणातच तुमच्या खात्यातून शक्य होईल तेवढी रक्कम हे भामटे आॅनलाईन ट्रान्सफर करतात. सकाळपासून सायंकाळपर्यंत हे लुटारू अशा प्रकारे रोज अनेकांना लाखोंचा गंडा घालतात.७०३३८२८३३५ क्रमांकापासून सावधान !या टोळीतीलच एक लुटारू स्वत:चे नाव राजा कुमार, बिहार असे सांगतो. तो स्वत:ला बँक अधिकारी असल्याचे सांगून एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याची थाप मारतो. तातडीने नवीन एटीएम कार्ड पाहिजे असेल तर स्वत:च्या बँक खात्याची आणि एटीएम कार्डची माहिती द्या, अन्यथा तुम्हाला पुन्हा एटीएम कार्ड मिळणार नाही, असा धाक दाखवतो. नागपुरात शुक्रवारी सकाळी मोबाईल क्रमांक ७०३३८२८३३५ वरून या भामट्याने काहींना फोन करून अशाच प्रकारे ठगविण्याचा प्रयत्न केला. या मोबाईलवरून येणाऱ्या फोनला कोणतीही माहिती देऊ नये.