लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात झपाट्याने वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यासाठी सायबर पोलीस ठाणे मंजूर झाले आहे. पुढच्या आठवड्यात हे पोलीस ठाणे कार्यरत होऊ शकते, अशी शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.नागपुरात गेल्या काही दिवसापासून सायबर गुन्हेगारी कमालीची वाढली आहे. रोज नवनव्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. गुन्हे शाखेत सायबर सेल आहे. मात्र सायबर सेलला स्वतंत्र अधिकार आणि मनुष्यबळ नसल्याने या गुन्ह्यांना आळा घालण्यात अडसर निर्माण झाला आहे. ते लक्षात घेऊन नागपुरात सायबर पोलीस स्टेशन सुरू करावे, असा मागणीवजा प्रस्ताव पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पोलीस महासंचालनालयाकडे पाठविला होता. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली असून मनुष्यबळही निश्चित झाले आहे. त्यानुसार नागपूरच्या सायबर पोलीस ठाण्यासाठी ४ पोलीस निरीक्षक, ९ सहायक निरीक्षक, ३ उपनिरीक्षक, ३ सहायक उपनिरीक्षक, १२ हवालदार १५ नायक, २६ पोलीस शिपाई आणि २ वाहन चालक अशी एकूण ७४ पदे मंजूर करण्यात आली आहेत.गुन्हे शाखेतून होणार नियंत्रितगुन्हे शाखेतील एक सहाय्यक पोलीस आयुक्त या सायबर पोलिस ठाण्याला नियंत्रित करणार आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त परिमंडळ अधिकारी म्हणून आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रादेशिक विभाग प्रमुख म्हणून या पोलिस ठाण्याच्या कारभारावर नियंत्रण ठेवणार आहेत. शहरातील ३२ ही पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र या सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकारात राहणार आहे.गुन्हे शाखेत सुरू होणारसध्या गुन्हे शाखेच्या इमारतीत सायबर शाखेचा कारभार सुरू आहे. तेथे अत्याधुनिक यंत्रणा लावण्यात आली आहे. केवळ पोलिस ठाण्याचा फलक तेवढा लावणे बाकी आहे. हा फलक लावण्यासोबतच येथील ठाणेदार म्हणून येत्या चार ते पाच दिवसात पोलीस आयुक्त संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहेत. पुढच्या आठवड्यात सायबर ठाण्याचा कारभार सुरू होईल, असे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
नागपुरात सुरू होणार सायबर पोलीस ठाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 10:53 PM
नागपुरात झपाट्याने वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यासाठी सायबर पोलीस ठाणे मंजूर झाले आहे. पुढच्या आठवड्यात हे पोलीस ठाणे कार्यरत होऊ शकते, अशी शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
ठळक मुद्देमनुष्यबळ निश्चित : पोलिस निरीक्षकांसह ७४ अधिकारी कर्मचारी काम करणार