लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन लिमिटेडच्या माध्यमाने १८ किमीचा डेडीकेटेड सायकल ट्रॅक लवकरच निर्माण केला जाणार आहे. आता शहरात नवीन रस्त्याची कामे करतानाच सायकल ट्रॅकचा डिझाईनमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी दिली.
राधाकृष्णन बी. आणि नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते रामगिरीच्या समोरील पहिल्या टप्प्यातील ६ किमीच्या सायकल ट्रॅकच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. केंद्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय, स्मार्ट सिटीज मिशनच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेले इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज उपक्रमात सायकल ट्रॅकचे निर्माण होणार आहे. कोविड-१९ च्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी सायकलचा वापर केला. सायकल चालविल्याने आपले शरीर निरोगी आणि सुदृढ राहते तसेच पर्यावरणालासुद्धा याचा मोठा फायदा होतो. सायकल ट्रॅक तयार करण्यासाठी वेगळ्याने जमीन संपादन करण्याची गरज नाही, अशी माहिती राधाकृष्णन बी. यांनी दिली.
सायकल ट्रॅकच्या माध्यमातून सायकल चालविणाऱ्यांसाठी ही फारच मोठी संधी स्मार्ट सिटीच्या वतीने उपलब्ध करून दिली जात असल्याचे भुवनेश्वरी एस यांनी सांगितले. फूटपाथलगत १.५ मीटर रुंद सायकल ट्रॅकसाठी कोल्ड प्लास्टिक पेंटचा वापर करण्यात येत आहे, ही माहिती प्रबंध निदेशक अमित थत्ते यांनी दिली.
पहिला टप्पा : रामगिरी-लेडीज क्लब-लॉ कॉलेज चौक-महाराजबाग-विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान-जपानी गार्डन-रामगिरी या रस्त्यावर काम करण्यात येत आहे.
प्रस्तावित १८ किमी सायकल ट्रॅक : लॉ कॉलेज चौक-बोले पेट्रोल पंप-नीरी-यू टर्न घेऊन बोले पेट्रोल पंप-महाराजबाग-जपानी गार्डन-टीव्ही टॉवर- वायुसेनानगर-फुटाळा तलाव- वॉकर्स स्ट्रीट-लेडीज क्लब-लॉ कॉलेज.