नागपूर : जागतिक महिला दिवस व जागतिक लठ्ठपणा दिवसानिमत्त निरोगी आरोग्यासाठी सायक्लॉथानचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे बुधवारी झिरो माईल येथे सकाळी महिलांची सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी पहिला क्रमांक मिळविला. दुसरा क्रमांक उप आयुक्त आरोग्य विभागातील जिल्हा स्तरीय गटप्रवर्तक दीपाली चांदेकर यांनी तर तिसरा क्रमांक उपसंचालक आरोग्य सेवा डॉ विनिता जैन यांनी मिळविला. प्रोत्साहनपर पारितोषिक विद्यार्थी निहारीका वाकोडकर व प्रशासकीय अधिकारी सुषमा बानिक यांना प्रदान करण्यात आले. स्पर्धेत सर्व सहभागी महिला पदाधिकारी व महिला अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र व टी-शर्ट देण्यात आले.
सायकलिंग हा एक एरोबिक व्यायाम प्रकार असून सायकल चालवण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. नियमितपणे सायकलिंगच्या व्यायामामुळे ह्रदय, फुफ्फुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते, वजन नियंत्रणात राहण्याला मदत होते. याचा विचार करता सायकलींगला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सायकल स्पर्धेतमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता विष्णू कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, आरोग्य विभागातील महिला अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला.