विशाल महाकाळकर
नागपूर : पर्यावरणाबाबत नागरिकांना जागरूक करण्याचे ध्येय घेऊन यवतमाळ जिल्ह्यातली एक मुलगी एकटी सायकलने थेट लेह-लद्दाखला निघाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात आलेली प्रणाली चिकटे ही सायकलपटू शुक्रवारी सकाळी आपल्या सायकलने दिल्लीकडे रवाना झाली. तिथून ती लेह-लद्दाखपर्यंत मजल मारणार आहे.
नागपूर ते दिल्ली हा प्रवास महामार्गाने न करता शक्यतो ग्रामीण भागातून करण्याचा तिचा विचार असून, या संपूर्ण प्रवासात पर्यावरणाचे महत्त्व नागरिकांना सांगण्याचा तिचा मानस आहे. याआधी प्रणालीने संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला असून, आजपर्यंत एकूण २५ हजार कि.मी.हून अधिक सायकल चालविली आहे.
यवतमाळच्या वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा खेड्यातून आलेल्या प्रणालीने बी. एस. डब्ल्यू केले आहे. सायकलवरून कन्याकुमारीला जाण्याचे स्वप्न तिच्या मनात होते. त्याच्या पूर्वतयारीसाठी तिने कोरोनाकाळात सायकलवरून घरोघरी वर्तमानपत्र टाकण्याचे काम सुरू केले. जवळपासच्या गावांना सायकलने भेटी देऊन आपल्या निर्धाराला ती खतपाणी घालत राहिली. आधी विदर्भ व नंतर पूर्ण महाराष्ट्रभर ती सायकलवरून फिरली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सायकल हा सर्वोत्तम मार्ग आहे, असे ती मानते. भविष्यात तिला संपूर्ण भारत दौरा करायचा आहे. तसेच पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करायचे आहे.
'दोन चाकं, ४३५ दिवस' ही डॉक्युमेंटरी
प्रणालीने संपूर्ण महाराष्ट्र सायकलने पिंजून काढला आहे. तिने ४३५ दिवसांत केलेल्या १७ हजारांहून अधिक कि.मी. प्रवासाच्या अनुभवावर, 'दोन चाकं, ४३५ दिवस' हा माहितीपट २०२२ मध्ये निघाला असून त्याला बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्म म्हणून पुरस्कारही मिळाला आहे.
प्रवासात चांगले अनुभव अधिक
एकटी मुलगी सायकलने हजारो कि.मी.चा प्रवास करते म्हटल्यावर उभा राहणारा पहिला प्रश्न सुरक्षेचा असतो. यावर प्रणाली सांगते, असे वाईट अनुभव फारसे आले नाहीत. मध्यंतरी एकदाच एक मोटारसायकलवाला मागे लागला व अपशब्द वापरू लागला होता. त्याला चांगले खडसावले तेव्हा तो मुकाट्याने निघून गेला. मी जिथे जिथे जाते, तिथे लोक स्वागतच करतात. आदराने बोलतात. माहिती विचारतात व मदतही करतात.
सायकलवारीने काय शिकवले
हजारो कि.मी. सायकलवरून जाणे. वाटेतल्या गावातील सरपंचांची भेट घेऊन तेथील विद्यार्थी व नागरिकांना भेटणे. त्यांच्याशी गप्पा मारणे व पर्यावरणाबाबत संवाद साधणे हा प्रणालीचा आवडता कार्यक्रम असतो. या संवादातून आपल्याला आयुष्यातील अनेक चांगल्या बाबींचे आकलन झाल्याचे ती सांगते. यात संवादकला, स्नेहभाव, पर्यावरणवाद आणि धाडस हे गुण ती विशेषत्वाने नमूद करते.