मंगेश व्यवहारे
नागपूर : केंद्र सरकारने चूलमुक्त भारत करण्यासाठी उज्ज्वलासारख्या योजना राबविल्या. लोकांना घरगुती वापरासाठी इंधन म्हणून गॅस सिलिंडरच्या सवयी लावल्या; पण आजच्या घडीला सिलिंडरची किंमत हजार रुपये झाली आहे. महिन्याला १० ते २० हजार रुपये कमावणाऱ्या वर्गाला सिलिंडर घेणे डोईजड झाले आहे. त्यामुळे पुन्हा घरोघरी मातीच्या चुली पेटू लागल्या आहेत. परिणामी लाकडाचे टाल वस्त्यांवस्त्यामध्ये वाढले आहेत.
शहरामध्ये उज्ज्वला योजनेचेच ८० हजारांच्या जवळपास कनेक्शन आहेत, तर घरगुती गॅस कनेक्शन किमान ५ लाखांच्या वर आहे. आज प्रत्येक घरात गॅस कनेक्शन आहे; पण गॅसची किंमत वाढल्याने इंधन म्हणून आता लोकांनी जळाऊ लाकडाचा पर्याय शोधला आहे. उत्तर नागपुरातील लीलाबाई चावके यांचे ६ जणांचे कुटुंब आहे. घरातील मिळकत १८ हजार रुपये आहे. हिवाळ्याच्या दिवसात गरम पाणी व स्वयंपाक गॅसवर केल्यास १८ ते २० दिवसांत सिलिंडर संपते. इंधन म्हणून सिलिंडर वापरल्यास महिन्याला २००० रुपयांचा गॅस लागतो. ३०० रुपयांच्या लाकडात महिनाभर पाणी गरम व एक वेळेचा स्वयंपाकही होतो. किंमत कमी होती, त्यामुळे सिलिंडर परवडत होते. आता एकवेळेच्या स्वयंपाकासाठी सिलिंडर वापरतो. ही परिस्थिती प्रत्येक सामान्यांची आहे.
लाकडाच्या टालची संख्या वाढली
२० ते २५ वर्षांपूर्वी सिलिंडरचा वापर कमी असल्याने वस्त्यावस्त्यांमध्ये लाकडाचे टाल होते. अशीच परिस्थिती सध्या शहरामधील वस्त्यांवस्त्यामध्ये दिसून येत आहे. लोकांनी बंद केलेले टाल परत सुरू केले आहेत. लोकांना वस्तीमध्ये स्वस्त इंधन मिळत असल्याने किलोमागे रुपया-दोन रुपये आम्हालाही मिळत असल्याचे टालवाले साहू यांनी सांगितले.
- टिंबर मार्केटमधून ८० टक्के वेस्टेज सामान्य जण नेतात
टिंबर मार्केटमध्ये लाकडांची कटाई केल्यानंतर २५ टक्के वेस्टेज निघते. पूर्वी हे वेस्टज बाहेरगावाहून आलेल्या लेबरचे अन्न शिजविण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर घेऊन जात होते; पण आता वेस्टेज लाकूड घेऊन जाणारे ८० टक्के लोक हे सामान्य आहेत. घाटरोडच्या टिंबर मार्केटमध्ये लाकडाचे जे वेस्टेज निघते ते शिल्लकच राहतच नाही. ५ ते ६ रुपये किलोने सहज घेऊन जातात.
रसिकभाई पटेल, टिंबर व्यवसायी
- सबसिडी नावालाच
हजार रुपये गॅस झाला आज. सबसिडी बघितली तर ४० रुपये. पूर्वी घरगुती गॅसवर ३०० रुपयांपर्यंत सबसिडी मिळायची. सरकार गॅस सिलिंडरची सबसिडी बंद करण्याच्या मार्गावर आहे. सर्वच प्रकारच्या इंधनाच्या किमती वाढल्याने सामान्यांचे जगणे अवघड झाले आहे.
मंगेश कामोने, सामाजिक कार्यकर्ते